कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे (बांबर्डे तर्फ कळसुली) - देऊळवाडी येथील प्रमोद चंदकांत बांबर्डेकर यांच्या राहत्या घराला अचानक आग लागली. यात घराचे छप्पर, फर्निचर, सोफा, इलेक्ट्रॉनिक वायरिंग, टीव्ही व अन्य साहित्य जळून नुकसान झाले. स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत सुमारे दीड ते दोन लाखाचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. शॉट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला.
प्रमोद बांबर्डेकर पत्नीसह दोघेच या घरात राहतात. सोमवारी सकाळी दोघेही कामानिमित्त कुडाळला गेले होते. दरम्यान पाऊसही काही प्रमाणात कमी झाला होता. त्याचवेळी त्यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले.
आग लागल्याचे निदर्शनास येताच शेजारील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करीत आग विझविण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू केले. मात्र तोपर्यंत घरातील बरेच साहित्य आगीत जळून खाक झाले. यात छप्पराचे वासे, रिपा, फर्नीचर, सोफा, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक वायरिंग, टेबल यांसह अन्य काही साहित्य जळाले. या घटनेची माहीती मिळताच बांबर्डेकर दाम्पत्य लागलीच कुडाळहून घरी दाखल झाले. या घटनेने त्यांना धक्काच बसला.
या घटनेत सुमारे दीड ते दोन लाखाचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच वेताळबांबर्डे सरपंच वेदिका दळवी, उपसरपंच प्रदीप गावडे, कुडाळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम, तलाठी विद्या अरदकर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. उपसरपंच प्रदीप गावडे, ग्रामस्थ सतीश बांबर्डेकर, निलेश बांबर्डेकर, रमन गावडे, बाबलो बांबर्डेकर आदींसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. त्या सर्वानी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान शॉट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज उपस्थित यंत्रणांकडून वर्तविण्यात आला.