Paper Leak Case Protest | ‘सीईटी’ पेपर ६ लाखांत, ‘नीट’ पेपर ८ लाखांत!  
सिंधुदुर्ग

Paper Leak Case Protest | ‘सीईटी’ पेपर ६ लाखांत, ‘नीट’ पेपर ८ लाखांत!

पेपरफुटीच्या निषेधार्थ कुडाळात उबाठा शिवसेनेचे अनोखे ‘पेपर विक्री’ आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : ‘या... या... लवकर या, विकत पेपर घ्या, पाच लाखांना दोन पेपर घ्या, जीडी पेपर चार लाखांत, सीईटी पेपर सहा लाखांत, नीट पेपर आठ लाखांत, घ्या घ्या लवकर घ्या, अशी फेरीवाल्यांच्या स्टाईलमध्ये उपरोधात्मक घोषणाबाजी करत बुधवारी कुडाळ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवासेेनेने कुडाळ आठवडा बाजारादिवशी भर पावसात अनोखे व उपरोधात्मक 'पेपर विक्री केंद्र' आंदोलन छेडले. ‘कशी नशिबानं थट्टा आज मांडली' हे गाणे लावून स्टाॅलवर टोपल्यांमध्ये डमी पेपरचा बाजार मांडून पेपर फुटीचा तसेच सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला.

कुडाळ-गांधीचौक येथे युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली ठाकरेंच्या शिवसैनिकांनी हे आंदोलन छेडले. आठवडा बाजारात 'भ्रष्ट सरकारी स्पर्धा परीक्षा पेपर विक्री केंद्र' उभारून लाऊडस्पीकरद्वारे फेरीवाल्यांच्या स्टाईलमध्ये उपरोधात्मक हाकारी देत डमी प्रश्नपत्रिकांची विक्री करण्यात आली. यावेळी नीट, टीईटी, सीईटी, जीडी परीक्षा, आणि इतर सरकारी भरतीचे डमी पेपर मान्सून ऑफरमध्ये लाखो रुपयांना सेलमध्ये उपलब्ध आहेत, असे प्रतीकात्मक दृश्य उभे करून सरकारचा निषेध केला.

शिक्षणाचा खेळखंडोबा करणाऱ्या सरकारचा निषेध असो, भ्रष्ट सरकार हाय हाय, शिक्षणमंत्री हाय हाय, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी छेडछाड करणाऱ्या सरकारचा निषेध असो, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्यायलाच पाहीजे, अशी जोरदार घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली. उबाठाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, शहरप्रमुख संतोष शिरसाट, युवासेना तालुकाप्रमुख तथा पं.स.सदस्य योगेश धुरी, जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर, अतुल बंगे, सौ. अर्चना बंगे आदींसह शिवसैनिकांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.

सरकार विद्यार्थ्यांचे भवितव्यही फोडत आहे

मंदार शिरसाट म्हणाले, सरकार आमदार-खासदार फोडताहेत, तसेच आता पेपर फोडून विद्यार्थ्यांचे भवितव्यही फोडत आहेत. त्यामुळेच उपरोधात्मक आंदोलन करून सरकारचे डोळे उघडण्याची ही वेळ आमच्यावर आली आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ थांबवावा. जर सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्यास, भविष्यात ठाकरे शिवसेना- युवासेना सिंधुदुर्गात तीव्र आंदोलन उभारेल, असा इशाराही त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT