Kudal Traffic Problem
कुडाळ : कुडाळ शहरातील ट्रॅफिक जॅमची समस्या कायमची सोडविण्यासाठी नगरपंचायत प्रशासनामार्फत प्रभावी उपाययोजना करण्यात येणार आहेत. शिवाय शहरातील रस्ता दुतर्फा अतिक्रमणावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. फेरीवाले, फिरत्या विक्रेत्यांनीही न.पं.च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. शहर विकासासाठी आ. नीलेश राणे यांच्या अनेक संकल्पना आहेत. त्यासाठी व्यापारी म्हणून सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असे आवाहन नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी केले. त्यावर सर्वांचे सहकार्य राहील, अशी ग्वाही उपस्थित व्यापार्यांनी दिली.
कुडाळ शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी मंगळवारी न. पं. येथे शहरातील व्यापार्यांसमवेत विशेष बैठक आयोजित केली होती. उपनगराध्यक्ष किरण शिंदे, व्यापारी संघटना तालुकाध्यक्ष श्रीराम शिरसाट, उपाध्यक्ष गोविंद सावंत, सचिव भूषण मठकर, खजिनदार नितीश म्हाडेश्वर, द्वारकानाथ घुर्ये, पी.डी. शिरसाट, विद्याप्रसाद बांदेकर, सुनील भोगटे, मंदार श्रीकृष्ण शिरसाट, प्रसाद शिरसाट, संजय भोगटे, संदेश पडते, अमेय शिरसाट, राकेश वर्दम, आपा भोगटे, भाऊ राऊळ, आदींसह नगरसेवक उपस्थित होते.
वाहतूक कोंडी, अतिक्रमण, प्लास्टिक बंदी याबाबत व्यापार्यांनी मते व्यक्त केली. बाजारपेठेतील रस्ता मोकळा करावा, मालवाहू अवजड वाहनांना ठराविक वेळ ठरवून द्यावी, रस्त्यालगत अतिक्रमण केलेल्या संबंधितांना नोटीस देऊन, पुढील कार्यवाही करावी, याबाबत पोलिस, नगरसेवक व व्यापारी यांची बैठक घेऊन, ठोस कार्यवाही करावी. फिरत्या विक्रेत्यांसह फेरीवाल्यांना जागा नेमून द्याव्यात, प्लास्टिक बंदीबाबत नागरिकांमध्येही जनजागृती करावी, अशी मागणी व्यापार्यांनी केली. पोस्ट ऑफिस चौका दरम्यान वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मालवण रोडलगतच्या सर्व टपर्या हटविण्याची सूचना करण्यात आली. त्यावर नगरसेवक मंदार शिरसाट यांनी ही कारवाई करताना सर्व अतिक्रमणावर कारवाई व्हावी अशी मागणी केली.
प्रसाद शिरसाट यांनी बुधवारी आठवडा बाजारादिवशी जिजामाता चौक, गांधीचौक व मच्छीमार्केट येथे वाहतूक पोलिस तैनात ठेवण्याची मागणी केली. उपनगराध्यक्ष शिंदे यांनी बुधवारी आठवडा बाजारादिवशी शहरातून डंपरना बंदी घालण्याची सूचना केली. सुनील भोगटे म्हणाले, वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडण्यासाठी न.पं. ने नियम घालणे आवश्यक आहे. कोणतीही मोहीम राबविताना त्यात सातत्य ठेवावे.
नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर म्हणाल्या, शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी न.पं. कडक पावले उचलणार आहे. आता शाळा सुरू झाल्या आहेत, रस्त्यांवर रहदारी वाढत आहे. त्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही, याची दक्षता घेऊन ट्रॅफिकचा प्रश्न दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. रस्त्यालगतच्या अतिक्रमणावरही कारवाई करण्यात येणार आहे. व्यापारी संघटनेनेही एक पत्र न.पं.ला द्यावे, त्यानंतर कार्यवाही हाती घेण्यात येईल. प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मालवण रोड लगत अतिक्रमण केलेल्या स्टॉलवर कारवाई करण्याबाबत आपण सा. बां.विभागाकडे पत्रव्यवहार केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आ. नीलेश राणे यांच्या शहराच्या विकासासाठी अनेक संकल्पना आहेत. हॉटेल अभिमन्यू ते काळपनाका मुख्य रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्याचा प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे दिला आहे. लवकरच हा रस्ता काँक्रिटचा आणि रूंद होणार आहे. यावेळी अनेक अडचणी येतील, पण त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. शहर 21 व्या शतकातील विकसित शहर बनविण्याचा आ. राणे यांचा मानस आहे.त्यासाठी व्यापारी व नागरीकांचे सहकार्य आवश्यक आहे, असे नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर यांनी यावेळी सांगितले.
प्लास्टिक बंदीबाबत जसे व्यापार्यांना आवाहन केले तशीच जनजागृती ग्राहकांमध्येही व्हावी अशी मागणी करण्यात आली. त्यावर कर निरीक्षक राजू पठाण म्हणाले, प्लास्टिक बंदी ही काळाची गरज आहे. न.पं. प्रशासनाकडून शहरात ध्वनिक्षेपकाद्धारे याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जाईल. प्लास्टिक बंदी असून, कुठेही प्लास्टिक पिशव्या मिळणार नाहीत. त्यामुळे खरेदीसाठी येताना प्रत्येकाने कापडी पिशवीच आणावी, लास्टिक पिवशी आढळून आल्यास ती पिशवी घेणार्याला आणि विकणार्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर म्हणाल्या, मुख्य रस्त्यालगत न.पं. मार्फत गटार बांधकाम चालू आहे. परंतु जिजामाता चौक नजीक एक शेड अडचणीची ठरत आहे. याबाबत संबंधितांना आपण ती शेड मागे घेण्याची विनंती केली आहे. परंतु प्रतिसाद दिलेला नाही. त्यांनी ती शेड स्वतःहून मागे घ्यावी अशी आपली विनंती आहे. अन्यथा न.पं. प्रशासनामार्फत संबंधिताला नोटीस देऊन न.पं. कारवाई करेल, मग मी त्यात दोषी नसेल. पण गटार बांधकाम पूर्ण केले जाईल.