कुडाळ तालुक्यात बंद घरे चोरट्यांनी टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. सलग दुसर्या दिवशी पिंगुळी-काळेपाणी येथील सौ. सुरेखा पद्माकर तानावडे यांचे बंद घर फोडून आतील रोख रक्कम, सोन्या, चांदीचे दागिन्यांसह सुमारे 1 लाख 16 हजाराचा मुद्देमाल लंपास केला आहे. मालक घर बंद करून बाहेरगावी गेल्या पासून 12 तासांच्या आत ते फोडण्यात आले. यावरून चोरटे रेकी करण्यात सराईत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सौ. सुरेखा तानावडे या 6 जून रोजी सायंकाळी 6.30 वा मुलगा, सून व नातवंडे यांच्यासह मोठा मुलगा स्नेहल याच्याकडे मुंबई खारघर येथे गेल्या होत्या. 7 जून रोजी दुपारी सौ.सुरेखा तानावडे यांच्या बहिणीचा मुलगा नंदन गोवेकर यांना सौ.सुरेखा यांच्या शेजारी राहणार्या एका व्यक्तीने कॉल करुन तुझ्या मावशीच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. त्यानंतर नंदन गोवेकर मावशी सौ. सुरेखा यांच्या घरी गेले. त्यावेळी घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला व दरवाजाचे कुलूप तुटलेल्या स्थितीत घराचे खिडकीवर ठेवलेले आढळले. त्यांनी घरात जावून खात्री केली असता घराच्या खोलीतील 2 पत्र्याच्या कपाटांचे दरवाजे उघडे होते व कपाटामधील सामान विस्कटलेले होते.
तसेच घराला लागून असलेल्या स्लॅबच्या घराच्या खोलीतील दोन पत्र्याच्या कपाटांचे दरवाजे व 1 लाकडी कपाटाचा दरवाजे उघडे होते. आतील सामान विस्कटलेले होते. त्यांनी या घटनेची माहिती मावशी सौ. सुरेखा तानावडे यांना दिली. यावेळी त्यांनी कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तू आहेत का ? याची खात्री करण्यास सांगितले असता वस्तू त्याठिकाणी न आढळल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले.
यामध्ये 40 हजार रुपये रोख रक्कम , 8 ग्रॅम वजनाची 24 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन, 8 ग्रॅम वजनाचे 24 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, प्रत्येकी 3 ग्रॅम वजनाच्या 18 हजार रुपये किंमतीच्या 2 सोन्याच्या अंगठ्या, 10 हजार रूपये किंमतीचे 200 ग्रॅम वजनाचे चांदीचे ताट व वाटी असा एकूण 1 लाख 16 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला.
सौ. सुरेखा तानावडे यांचे जुने कौलारू घर व स्लॅबचे घर एकमेकांना जोडून आहे. या चोरट्याने कौलारु घराच्या दरवाज्याच्या कडी कोयंडा तोडला. या कौलारू घरातून स्लॅबच्या घरात प्रवेश करत यातील या किंमती वस्तू चोरून नेल्या. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहा.पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी श्वान पथक पाचारण करण्यात आले ते घराच्या परिसरातच घुटमळले. ठसेतज्ञानी ठसे घेतले आहेत. कुडाळ तालुक्यात 48 तासातील ही दुसरी चोरी आहे. दोन्हीही बंद घरे चोरट्याने टार्गेट करत पडली आहेत. यापूर्वी अनेक बंद घरे फोडली. मात्र यातील टीव्ही सारख्या किरकोळ वस्तूच चोरट्यांच्या हाती लागल्या. मात्र या सलग दोन दिवसात झालेल्या दोन्ही चोर्यात चोरट्यांच्या हाती मोठा ऐवज लागला आहे. तानवडे कुटुंबीय घर बंद करून गेल्याच्या त्याच रात्री ही चोरी झाली. त्यामुळे हे चोरटे रेकी करण्यात सराईत असल्याचे स्पष्ट होत आहे. या घटनेची फिर्याद नंदन गोवेकर यांनी कुडाळ पोलिसात दिली आहे. अधिक तपास सहा. पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे करत आहेत.