कुडाळ : कुडाळ एसटी आगाराला आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा करू, तसेच कुडाळ आगाराला नव्याने दहा बसेस उपलब्ध करून देण्यात येतील, मात्र पावसाळ्यात विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्या, अशी सूचनाही आ.नीलेश राणे यांनी कुडाळ एसटी आगार प्रशासनाला केली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आ. राणे यांनी बुधवारी कुडाळ एसटी आगाराच्या अधिकार्यांसोबत बैठक घेत आगारातील सुविधा व समस्यांचा आढावा घेतला. उद्यमनगर येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे ही बैठक झाली. कणकवली विभागीय यंत्र अभियंता सुजित डोंगरे, विभागीय वाहतूक अधीक्षक नीलेश लाड, सेवाशक्ती संघर्ष एस.टी कर्मचारी संघटनेचे केंद्रीय नेतृत्व रोशन तेंडुलकर, विभागीय उपाध्यक्ष नीलेश तेंडुलकर, विभागीय सचिव भरत चव्हाण, कुडाळ आगार अध्यक्ष दादा साईल, कार्याध्यक्ष सुनील बांदेकर, प्रशांत गावडे, संजय हुमरमळेकर, आगार सचिव मिथुन बांबुळकर, महेश तावडे, नीलेश कसालकर आदी उपस्थित होते.
बैठकीत कुडाळ एस.टी स्थानक व आगारातील समस्या, दररोज उशिरा सुटणार्या गाड्या, गाड्या अचानक रद्द होण्याचे वाढलेले प्रमाण याबाबत नीलेश तेंडुलकर यांनी आ. राणे यांचे लक्ष वेधले. तसेच नवीन बसस्थानक इमारत बांधताना आराखड्यातील तांत्रिक चुकांमुळे प्रवाशांना होत असलेल्या त्रासाबाबतही माहिती दिली. या तांत्रिक चुका दुरुस्त करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन आ.राणे यांनी दिले.नवीन बसेस आणि पोलीस चौकीची मागणी कुडाळ आगाराला लवकरच दहा नवीन बसेस मिळवण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे आमदार राणे यांनी सांगितले. तसेच, जुन्या बस स्थानकात असलेली पोलीस चौकी नवीन बस स्थानकातही असावी, अशी मागणी केली. आमदार राणे यांनी अधिकार्यांशी चर्चा करून कुडाळ आगाराच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
कुडाळ आगारातील सीएनजी बसेसमुळे वाहतूक कोलमडली असल्याचे संघटना पदाधिकार्यांनी आमदार राणे यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर यंत्र अभियंता सुजित डोंगरे यांनी सीएनजी बसेस झाराप येथील पंपावर सीएनजी गॅस भरण्यासाठी जात असल्याने हा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत येत्या दोन ते तीन दिवसात कुडाळ आगारातील जागा सीएनजी पंपासाठी देण्यात येणार आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात आगारातील पंप सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.
या वर्षी कुडाळ आगाराला एकही नवीन बसेस न मिळाल्याने आपण परिवहन मंत्र्यांची भेट घेऊन लवकरात लवकर कुडाळ आगाराला किमान दहा .असावी,अशी मागणी करण्यात आली. आ. राणे यांनी यंत्र अभियंता सुजित डोंगरे यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. कुडाळ आगाराला आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्याबाबत परिवहन मंत्री सरनाईक तसेच वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा करून येत्या काही दिवसात प्रश्न मार्गी लावणार येतील, असेही त्यांनी आश्वस्त केले.