कुडाळ : कुडाळ एसटी आगारात किंवा शहरात जवळ सीएनजी गॅस स्टेशन नसल्याने आगाराच्या बसेसना शहरापासून 13 किमीवरील झाराप येथील पेट्रोल पंपावर सीएनजी गॅस भरण्यासाठी जावे लागते. यासाठी जाता - येता असे तब्बल 26 किलोमीटर अंतर विनाप्रवासी केवळ सीएनजी गॅस भरण्यासाठी कापावे लागत आहे. या 26 कि.मी.च्या प्रवासात एसटीला सीएनजी गॅसचा खर्च वाया घालवावा लागत आहे. शिवाय एक गॅस भरून आगारात परत येण्यासाठी बसला सुमारे एक तास वेळ लागत असून याचा थेट परिणाम एसटीच्या वेळापत्रकावर होत आहे.
वेळेत बसेस उपलब्ध होत नसल्याने अचानक काही बस फेर्या रद्द केल्या जातात तर काही फेर्यांना विलंब होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. डिझेलवरील खर्च वाचविण्यासाठी सीएनजी गॅसचा पर्याय एसटीने पुढे आणला खरा, पण गॅस भरून बसेस आगारात आणण्यासाठीचा मोठा खर्च आगाराला सहन करण्याची वेळ आली आहे. जर आगारात किवा शहरात गॅस स्टेशन उपलब्ध नाही तर विनाकारण गॅसवर चालणार्या बसेस आणायच्याच कशाला? असा सवाल प्रवाशांमधून केला जात आहे.
डिझेलवरील खर्च टाळण्यासाठी एसटी महामंडळाने सीएनजी गॅसवर बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग विभागातील आठ पैकी कुडाळ आणि वेंगुर्ले या दोन आगारात प्रायोगिक तत्त्वावर एसटी बसेस सीएनजी गॅसवर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कुडाळ आगाराला सीएनजी गॅसचा भार डोईजड झाला आहे. वेंगुर्ले आगारापासून सीएनजी गॅस स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे. पण कुडाळ आगारात किंवा शहर परिसरात सीएनजी स्टेशनच नाही. कुडाळ शहरापासून 13 किलोमीटरवर असलेल्या झाराप येथील पंपावर सीएनजी गॅस भरण्यासाठी तात्पुरता करार करण्यात आला आहे.
या आगारात सध्या 40 एसटी बसेस सीएनजी गॅसवर धावत आहेत. या बसेस गॅस भरून पुन्हा आगारात आणण्यासाठी स्वतंत्र चार चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका एसटी बसला झाराप पंपावर जाण्यासाठी 13 मिनिटे आणि परत आगारात येण्यासाठी 15 मिनीटे आणि तिथे गर्दीच्या वेळी गॅस भरण्यासाठी लागणारी साधारण 30 मिनिटे असा सुमारे एक तासाचा वेळ वाया जात आहे. याचा थेट परिणाम आगाराच्या प्रवाशी वाहतूक सेवेवर होत आहे. गॅस भरण्यासाठी गेलेल्या बसेसना पेट्रोल पंपावरील गर्दी, गॅसचा तुटवडा किंवा अन्य काही आकस्मिक कारणांमुळे आगारात येण्यास विलंब होतो. परिणामी आगाराच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. त्यामुळे बर्याचदा ग्रामीण बसफेर्या अचानक रद्द करण्यात येतात, तर काही बसफेर्या निर्धारित वेळेपेक्षा विलंबाने धावतात. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
आगारात गॅस पंप नसल्याने गैरसोय
13 किमी वरील झाराप येथे आहे पंप
जाता- येता 26 किमी रिकामी धावते एसटी
यासाठी प्रत्येक एसटीचा 1 तास वाया
परिणामी सातत्याने कोलमडते एसटीचे वेळापत्रक
गाड्या गॅसस्टेशनवर नेण्यासाठी स्वतंत्र चार चालक
डिझेलचा दर साधारण प्रति लिटर 95 रुपये आहे तर सीएनजी गॅसचा दर 86 रुपये आहे. त्यामुळे साधारण 9 रुपये वाचविण्यासाठी कुडाळ एसटी आगाराला तब्बल 26 किलोमीटरचे रनिंग केवळ सीएनजी गॅस फक्त गॅस भरून आणण्यासाठीच वाया घालवावा लागत आहे. त्यामुळे हा विनाकारण फटका आगाराला सोसावा लागत आहे. यातून प्रशासनाला नेमके काय साध्य करायचे आहे? जर आगारात सीएनजी गॅस स्टेशनच उपलब्ध नव्हते तर सीएनजी गॅसवर बसेस चालविण्याची घाई कशाला करायला हवी होती? कुडाळ-झाराप-कुडाळ असा वाया जाणारा गॅस याला जबाबदार कोण? असे सवाल प्रवाशांमधून उपस्थित केले जात आहेत. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
कुडाळ एसटी आगार मैदानावर एसटीच्या स्वमालकीचे सीएनजी गॅस स्टेशन प्रस्तावित आहे. याबाबतचा एमएनजीएल कंपनीसोबत एसटीचा करार झाला असून, ही कंपनी लवकरच गॅस स्टेशन उभारणार आहे.रोहित नाईक, आगार प्रमुख, कुडाळ