Sindhudurg News 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : जिल्हाधिकाऱ्यांची 'एन्ट्री' अन् वाळू माफियांची पळापळ!

१५ वाहने ताब्यात घेतल्याने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध वाळू उपश्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री धडक कारवाई करत १५ डंपर जप्त केले. या कारवाई मुळे जिल्ह्यातील वाळू व्यावसायिकांमध्ये कमालीची खळबळ उडाली आहे. या कारवाईचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे या केवळ कार्यालयात बसून सूचना देत नव्हत्या, तर त्या स्वतः रस्त्यावर उतरल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांची गाडी रस्त्यावर पाहताच वाळू माफियांची बोबडी वळली. कारवाईची कुणकुण लागताच अनेक चालकांनी वाहनातील वाळू रस्त्यावरच ओतून जंगलाचा आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला.

खाडी पात्रात अवैध उपसा करणाऱ्या काहींच्या बोटी प्रशासकीय विळख्यामुळे पात्रातच अडकून पडल्या. जप्त केलेली सर्व १५ वाहने सध्या संबंधित तहसील कार्यालयांच्या आवारात जमा करण्यात आली असून, त्यांच्यावर लाखांच्या घरात दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट करणाऱ्यांविरुद्ध आता प्रशासनाने 'झिरो टॉलरन्स' धोरण स्वीकारले आहे. सिंधुदुर्गाच्या पर्यावरणाचे रक्षण करणे ही आमची प्राथमिकता आहे. अवैध वाळू उपसा कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. ही तर फक्त सुरुवात आहे, अशा प्रकारच्या संयुक्त आणि गुप्त कारवाया यापुढेही सातत्याने सुरूच राहतील,"असा कडक इशारा प्रशासकीय सूत्रांनी दिला आहे.

जनतेतून कौतुकाचा वर्षाव

अवैध वाळू वाहतुकीमुळे जिल्ह्याचे रस्ते खराब होत होते, शिवाय पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत होता. मात्र, जिल्हा प्रशासनाने दाखवलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे सामान्य जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. विशेषतः महिला जिल्हाधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळी स्वतः मैदानात उतरून जी धडक कारवाई केली, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT