कुडाळ : कुडाळ तालुक्यातील 68 ग्रामपंचायतची सरपंच आरक्षण सोडत 15 जुलै रोजी होणार आहे. येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे स. 11 वा. ही सोडत होणार आहे.ओबीसी आरक्षणामुळे मागील सरपंच आरक्षण रद्द झाल्याने नव्याने सरपंच आरक्षण सोडत घेण्यात येणार आहे, ही आरक्षण सोडत चिठ्ठी पद्धतीने करण्यात येणार आहे. अशी माहिती कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी दिली.
काही महिन्यापूर्वी झालेले कुडाळ तालुक्यातील एकूण 68 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण रद्द झाले आहे. ग्रामपंचायत निवडणूक नियमातील तरतुदीनुसार अनुक्रमे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागासवर्गाचा प्रवर्ग आणि स्त्रीया (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागासवर्गाचा प्रवर्ग यातील स्त्रीयांसह) यांच्यासाठी आता नव्याने आरक्षित करायची आहे.
कुडाळ तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या प्रवर्ग निहाय सरपंचांची पदे ग्रामविकास विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-व दिनांक 13 जून 2025 अन्वये सन 2025 ते 2030 या कालावधीत होणा-या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका विचारात घेऊन आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. त्यांचे तालुकानिहाय वाटप निश्चित करण्यात आले आहे.
यामध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची पदे प्रवर्ग 2, महिला 3, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचाची पदे - प्रवर्ग 1, महिला 0, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचाची पदे - प्रवर्ग 9, महिला 9, खुला प्रवर्ग - प्रवर्ग 22, महिला 22 यानुसार तालुक्यातील ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार वीरसिग वसावे यांनी दिली.