कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या अमली पदार्थांच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी कुडाळ पोलिसांनी मोठी कारवाई करत एका तरुणाला गांजासह अटक केली आहे. या कारवाईत 536 ग्रॅम गांजा आणि इतर साहित्य असा एकूण 38 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शुभम संदीप परब (23, रा. कुडाळेश्वरवाडी, ता. कुडाळ) याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई 1.30 वा करण्यात आली. संशयिताला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अमली पदार्थांचे प्रमाण वाढत असल्याने तरुण पिढीवर त्याचे गंभीर परिणाम होत असल्याची बाब लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी जिल्ह्यात विशेष मोहीम हाती घेतली आहे. अमली पदार्थांची विक्री व साठा करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी विशेष अमली पदार्थविरोधी पथक स्थापन करून संशयितांवर लक्ष ठेवण्याचे काम सुरू केले होते. त्याच अनुषंगाने 1 एप्रिल रोजी पोलिस हवालदार प्रमोद काळसेकर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत एमआयडीसी-कुंभारवाडी येथील जुन्या पाण्याच्या टाकीजवळ एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार असल्याचे समजले. यानुसार पोलिसांनी तत्काळ सापळा रचत शुभम संदीप परब याला पकडले. पंचांसमक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 536 ग्रॅम गांजा (अंदाजे किंमत 26,800 रुपये), दोन चाकू, रोख रक्कम 3,870 रुपये, वजन काटा, रिकाम्या व वापरलेल्या प्लास्टिक पिशव्या तसेच आधार कार्ड व मतदान ओळखपत्र असा एकूण 38,270 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू आहे. आरोपीकडून गांजाचा साठा कुठून आला, त्याचे इतर साथीदार कोण आहेत, तसेच या मागे कोणते मोठे रॅकेट आहे का, याचा शोध घेण्याचे काम पोलिस करत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अति. पोलिस अधीक्षक नयोमी साटम व डीवायएसपी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम, पोलिस उपनिरीक्षक सचिन अवताडे तसेच पोलिस कर्मचारी कृष्णा केसरकर, प्रमोद काळसेकर, संजय कदम, सचिन गवस, समीर बांदेकर, रूपेश गवस आणि विष्णू रामदास यांनी यशस्वी केली.