कुडाळ : पुढारी वृत्तसेवा अंधारात सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररित्या गांजा या अंमली पदार्थांचे सेवन करताना मिळून आल्याने पिंगुळी व कुडाळ शहरातील अशा दोघां युवकांवर कुडाळ पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री १२. १५ कुडाळ शहरातील एका बिअर शॉपी नजीकच्या भागात केली आहे. यामध्ये कलम ८(सी),२७ प्रमाणे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून कुडाळ तालुक्यात अमंली पदार्थ विक्रीच्या अनुषंगाने कुडाळ पोलिसांनी कडक भूमिका घेत केलेली ही पहिली कारवाई आहे. यामुळे या क्षेत्रातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
कुडाळ पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार कुडाळ पोलीसांच्या पथकाने ही कारवाई केली. कुडाळ पोलीसांनी कुडाळ शहरातील एका बिअर शॉपी नजीकच्या परिसरात छापा टाकला. यावेळी हे दोन युवक अंधारात सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररित्या गांजाचे सेवन करताना पोलीसांना आढळले. पोलिसांनी या दोन्ही युवकांना ताब्यात घेत त्यांचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद पोलीस शिपाई योगेश मारुती मांजरेकर कुडाळ पोलीस ठाणे यांनी कुडाळ पोलीसात दिली आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक श्री.भांड यांनी भेट देऊन पाहणी केली . या घटनेचा अधिक तपास पोलीस श्री माने करत आहेत अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.