कुडाळ : कुडाळ-पानबाजार येथील क्षितिज अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या एका पॅथाॅलाॅजी लॅबला गुरुवारी सकाळी ७.३० वा. च्या सुमारास अचानक आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला. नगरपंचायत आणि एमआयडीसीच्या फायर ब्रिगेडच्या गाड्यांनी शर्थीचे प्रयत्न करीत आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, या आगीत लॅबमधील कागदपत्रे, साहित्य, उपकरणे जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
या लॅबमधून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी पोलिस व न. पं. अग्निशमन विभागाला याची माहिती दिली. लागलीच दोन अग्निशमन बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या फायर ब्रिगेडच्या गाड्यांच्या मदतीने पाण्याचा मारा करून वेळीच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. कुडाळ एमआयडीसी अग्निशमन दलाचे अधिकारी किरण साळुंखे यांच्यासह जवान तसेच कुडाळ न.पं.चे कर्मचारी संजय टेंबुलकर, गोट्या कोरगावकर, रमेश देऊलकर, सतीश जाधव यांच्यासह स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यात मदतकार्य केले. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, लॅबमधील कागदपत्रे, साहित्य, उपकरणे, जळून मोठे नुकसान झाल्याचे समजते. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. घटनास्थळी नागरिकांचीही गर्दी झाली होती. वेळीच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला.