कुडाळ : डिझेल-पेट्रोल दरवाढ रद्द च्या मागणीसाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत लागू असलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून विनापरवाना रॅली काढल्याप्रकरणी माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद महिला पोलीस फौजदार ममता लहू जाधव (वय ५१) यांनी दिली असून, त्यानुसार कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९९/२०२६ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ अन्वये नोंद करण्यात आला आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अप्पर जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी २० मे २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) अंतर्गत मनाई आदेश लागू करण्यात आले होते. असे असताना २७ मे २०२६ रोजी सकाळी ११ ते ११.४० या वेळेत शिवसेना (उबाठा) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कुडाळ येथील पक्ष कार्यालयासमोर एकत्र जमले.
यावेळी त्यांनी हातामध्ये पक्षाचे झेंडे व बॅनर घेऊन “डिझेल-पेट्रोल दरवाढ रद्द करा”, “भारत सरकारचा निषेध असो” अशा घोषणा देत शिवसेना पक्ष कार्यालय ते गांधी चौक आणि तेथून पुन्हा पक्ष कार्यालयापर्यंत पायी रॅली काढल्याचा आरोप आहे. संबंधित रॅलीसाठी प्रशासन अथवा पोलीस विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आली नसल्याने मनाई आदेशाचे उल्लंघन झाल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह अमरसेन सावंत (डिगस), मंदार शिरसाट (कुडाळ), योगेश धुरी (माणगाव), अश्पाक कुडाळकर (झाराप), अमित राणे (कुडाळ), बबन बोबाटे (झाराप) आणि अतुल बंगे (वालावल-हुमरमळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा ३० मे २०२६ रोजी दाखल करण्यात आला आहे . पोलीस हवालदार भोई हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत असून, घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक सावर्डे यांनी भेट दिली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक जे. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू आहे.