कुडाळ : नगराध्यक्षांच्या उपस्थितीत सभेचे कामकाज सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असलेले उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक. (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Kudal Municipal Council | नगराध्यक्षा-नगरसेवकाच्या ‘इगो’त सभा सहा तास रखडली

Ego clash in Meeting | कुडाळ न. पं. सर्वसाधारण सभेत दोघांचेही एकमेकांवर शाब्दिक वार

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या बुधवारी झालेल्या विशेष सभेत पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपा विरुद्ध भाजपा असा जोरदार सामना पाहायला मिळाला. शहरातील शासकीय जागा हस्तांतरणाच्या विषय अचानक खड्ड्यांवर जात नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर आणि नगरसेवक नीलेश परब यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. वैयक्तिक टोला - प्रतिटोल्यांबरोबरच त्यांच्यात ‘शाब्दिक युद्ध’ही रंगले. यामुळे सभागृहात गदारोळ होऊन वातावरण तंग बनले. सभाध्यक्षांचा अपमान झाला असून, नगरसेवक परब यांनी सभागृहातून बाहेर जावे ,अन्यथा माफी मागावी, अशी मागणी करत नगराध्यक्षांनी तोपर्यंत सभेचे कामकाज पुढे न चालविण्याची भूमिका घेतली.

दरम्यान, नगरसेवक नीलेश परब यांनी, आपण कोणाचा अपमान केलेला नाही, त्यामुळे सभागृहातून बाहेर जाणार नाही, अशी भूमिका घेतली. अशा प्रकारे दोघांचीही ‘प्रतिष्ठा’ पणाला लागल्याने उपस्थित अन्य नगरसेवकांची कोंडी झाली. दुपारी 12 वा. पासून सायंकाळी 6 वा. पर्यंत तब्बल 6 तास ही सभा स्थगित होती.

कुडाळ न.पं. ची ही विशेष सभा बुधवारी सकाळी 11.30 वा. आयोजित करण्यात आली होती. नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, मुख्याधिकारी अरविंद नातू, नगरसेवक विलास कुडाळकर, नीलेश परब, अभी गावडे, अ‍ॅड.राजीव कुडाळकर, उदय मांजरेकर, मंदार शिरसाट, नगरसेविका आफरीन करोल, अक्षता खटावकर, संध्या तेरसे, श्रेया गवंडे, सई काळप, ज्योती जळवी, श्रुती वर्दम, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी आदींसह खातेप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

या विशेष सभेच्या अजेंड्यावर एकूण पाच विषय होते. यात भंगसाळ स्मशानभूमी येथे विद्युत शवदाहिनी शेड बांधकाम व अनुषंगिक कामे करणे आणि अनंत मुक्ताई समोरील सार्वजनिक शौचालया लगत ई वाहन चार्जिंग स्टेशन उभारणे या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आला. त्यानंतर भाजपचे नगरसेवक विलास कुडाळकर यांच्या प्राप्त अर्जानुसार शासकीय मालकीची जागा नगरपंचायतीने ताब्यात घेण्याबाबत अर्जाचे वाचन करण्यात आले. या चर्चेत नगरसेवक नीलेश परब यांनी आताच या जागा न.पं.कडे हस्तांतरित करुन काय करणार?, यापूर्वी पोलिस स्टेशन नजीकच्या ट्रॅगल सुशोभीकरणासाठी 40 लाखांचा निधी आला होता, तो अन्यत्र वर्ग केला, मग ही जागा आता न.पं.कडे हस्तांतरित कशाला करता? असा सवाल केला. यावरून नगराध्यक्षा सौ. बांदेकर-शिरवलकर व श्री. परब यांच्यात शाब्दिक खटके उडाले. तुमच्या प्रभागातील खड्ड्यांवर लक्ष द्या, असा टोला सौ. बांदेकर यांनी परब यांना लगावला. त्यावर परबही आक्रमक झाले. त्यांनी नगराध्यक्षांना प्रत्युत्तर दिले आणि प्रकरण हातघाईवर आले. दोघांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. हा वाद एकमेकांवरील वैयक्तिक टिका टिप्पणीवर पोचला. परिणामी सभागृहातील वातावरण तंग बनले. अन्य नगरसेवकांनी दोघांना शांत राहण्याची विनंती केली, मात्र दोघांमधील शाब्दिक चकमक सुरूच होती.

नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर यांनी नगरसेवक श्री.परब यांनी सभागृहात उच्चारलेले शब्द सभा शास्त्राला योग्य नाहीत, हा सभाध्यक्षांचा अपमान आहे. असे सांगत श्री. परब यांनी सभागृहातून बाहेर जावे अन्यथा माफी मागावी, तोपर्यंत सभेचे पुढील कामकाज स्थगित केल्याचे स्पष्ट केले. तर नगरसेवक परब यांनी आपण कोणाचा अपमान केलेला नाही, त्यामुळे सभागृहातून बाहेर जाणार नाही, अशी भूमिका घेतली. दोघेही आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने दु. 12 वा. पासून सभेचे कामकाज स्थगित झाले.

दु. 2 वा. नगराध्यक्षा व नगरसेवक परब वगळता उर्वरित नगरसेवकांनी सभागृहातून बाहेर जात जेवण केले व पुन्हा सभागृहात दाखल झाले. 3.30 वा.च्या सुमारास नगरसेवक उदय मांजरेकर, आफरीन करोल, संध्या तेरसे व श्रेया गवंडे यांनी नगराध्यक्षांना सभेचे कामकाज पूर्ववत सुरू करण्याची विनंती केली. मात्र नगराध्यक्षा आपल्या भूमिकेवर ठाम होत्या. यावेळी पुन्हा नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर व नगरसेवक परब यांच्या शाब्दिक चकमक उडाली. तसेच सत्ताधारीच नगरसेवक अभिषेक गावडे आणि नीलेश परब यांच्यात शाब्दिक खटके उडाले.

दरम्यानच्या विरोधी ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी नगराध्यक्षा व नगरसेवक यांच्यातील वादाच्या चर्चेत सहभाग घेत, या सभागृहात वैयक्तिक कोणाचेही हेवेदावे नको. वैयक्तिक भांडणे बाहेर करा, इथे विकासकामांवर चर्चा व्हावी, तसेच यापुढील सभा पोलिस बंदोबस्तात घ्याव्यात असे सांगत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तर उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी 4 वा. च्या सुमारास सचिव म्हणून सीईओंनी याबाबत निर्णय द्यावा, अशी मागणी केली. त्यावर मुख्याधिकार्‍यांनी हा तुमचा निर्णय तुम्ही घेऊ शकता, असे एक वाक्यात स्पष्ट केले. सभेचे कामकाज स्थगित केल्याने नगरसेवक सभागृहात ठाण मांडून होते तर प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली होती.यापूर्वी कुडाळ ग्रामपंचायत असताना ग्रामपंचायतीची सभा अशाप्रकारे रात्री उशिरापर्यंत चालायची. याची यानिमित्ताने आठवण झाली.

8 नगरसेवकांचा सभात्याग; सभेचे काम सुरू!

नगरसेवक नीलेश परब यांच्या बाजूने असलेले भाजपाचे नगरसेवक रामचंद्र (निलेश) परब, उदय मांजरेकर, संध्या तेरसे, अक्षता खटावकर, आफरीन करोल, श्रेया गवंडे, ज्योती जळवी व उपनगराध्यक्ष किरण शिंदे या आठ नगरसेवकांच्या सह्यांचे पत्र सायं. 6.20 वा. उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी नगराध्यक्षा आणि मुख्याधिकारी यांच्याकडे देत सभात्याग केला.ही सभा नगराध्यक्ष यांच्या मनमानी व बेकायदेशीर वर्तनामुळे कोणतीही कार्यवाही न करता सुमारे चार तास रखडलेली आहे. सत्ताधारी व विरोधी नगरसेवक सभागृहात उपस्थित असूनही, ना कोणतेही विषय चर्चेस मांडण्यात आले, ना सभा तहकूबीचा निर्णय जाहीर करण्यात आला. नगराध्यक्षांनी जबाबदारी टाळत कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही, मुख्याधिका-यांनीही प्रशासकीय जबाबदार्‍या झटकत मौनव्रत धारण केले. हा प्रकार लोकशाहीविरोधी असून नगरसेवक व नागरिकांचा अपमान करणारा आहे. असे पत्र देत 8 नगरसेवकांनी सभात्याग केला. हे नगरसेवक सभागृहातून बाहेर गेल्यानंतर नगराध्यक्षांनी सभेचे कामकाज पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या.

सभाध्यक्ष म्हणून माझा अपमान झाला आहे

सभागृहात अशाप्रकारे सभाध्यक्षाशी वैयक्तिक पातळीवर बोलणे सभाशास्त्रानुसार योग्य नाही. प्रत्येक वेळी काही ना काही विषय काढून बोलले जाते. मात्र आज सभाध्यक्ष म्हणून माझा अपमान झाला आहे. त्यामुळे नगरसेवक नीलेश परब यांनी सभागृहातून बाहेर जावे, लगेच आपण सभेचे कामकाज सुरू करून लगेचच सभा संपवते, असे नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी सभागृहात बोलताना सांगितले.

मी कोणाचाच आपण अपमान केलेला नाही.

मी वैयक्तिक कोणाचेच नाव घेऊन बोललेलो नाही किंवा कोणाचाच आपण अपमान केलेला नाही. खड्ड्यांचा विषय काढण्याची गरजच नव्हती. माझ्या प्रभागातील खड्डे न.पं. प्रशासनामार्फत बुजवून घेण्यास मी नगरसेवक म्हणून सक्षम आहे. उगाचच खड्ड्यांचा विषय घेऊन नगरसेवकाचा अपमान केलेला योग्य आहे का? मी वैयक्तिक कोणावर चुकीचे बोललेलो नाही, त्यामुळे सभागृहातून बाहेर जाणार नाही, अशी भूमिका नगरसेवक नीलेश परब यांनी घेतली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT