कुडाळ : कुडाळ जिजामाता चौक येथे बुधवारी आठवडा बाजारादिवशी दोन भाजी विक्रेत्यांमध्ये शाब्दिक बचाबाची झाली. हा वाद विकोपाला जात एका भाजी विक्रेत्याने दुसर्या भाजी विक्रेत्यावर जीवघेणा चाकू हल्ला केला. यात भाजी विक्रेते महम्मदअली सुलतान बागवान (60, कुडाळ नाबरवाडी) यांना गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना बुधवारी सायं. 6 वा. घडली. जखमीला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हल्लेखोर भाजी विक्रेत्याला ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू केली होती. बुधवार हा कुडाळचा आठवडा बाजार असल्याने जिजामाता चौक परिसरात रस्त्यालगत फिरत्या भाजी विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. यातील दोन भाजी विक्रेत्यांत आपापसात काही कारणाने वाद झाला. वादाचे पर्यावसन मारामारीत झाले. यात एका भाजी विक्रेत्याने महम्मदअली सुलतान बागवान या भाजी विक्रेत्यावर चाकू सदृश धारधार शस्त्राने हल्ला केला.
बागवान यांच्या डाव्या खानाखाली गंभीर दुखापत झाली. त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत नातेवाईकांनी उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
या घटनेची माहीती मिळताच कुडाळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद चव्हाण व सिद्धेश चिपकर यांनी रूग्णालयात धाव घेत जखमीचा जबाब घेत पुढील कार्यवाही हाती घेतली होती. मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी सहका-यांसह रूग्णालयात धाव घेत जखमींना मदतीसाठी सहकार्य केले. कुडाळ पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली होती.