कुडाळ : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ विभाग ठाणे, गट कार्यालय, चिपळूण अंतर्गत कामगार कल्याण केंद्र, कुडाळ येथे शुक्रवारी गटस्तरीय जागतिक लोक संख्या दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात एक अपत्यावर संतती प्रतिबंधक शस्त्रक्रिया केलेल्या तसेच दोन मुलींवर शस्त्रक्रिया केलेल्या 5 कामगार सुखी जोडप्यांचा सत्कार करण्यात आला.
कुडाळचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण धडे यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. संजय केसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम कामगार कल्याण केंद्रात पार पडला. महावितरणचे उपव्यवस्थापक नीलेश राऊळ, कणकवली केंद्र संचालक संतोष नेवरेकर, कुडाळ केंद्र प्रमुख सुस्मिता नाईक आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम प्रभारी कामगार कल्याण अधिकारी राजेंद्र पंडित-निकम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
सत्यवान बाबाजी राऊळ, सौ. सावली सत्यवान राऊळ, संतोष घनश्याम गावडे, सौ. तृप्ती संतोष गावडे, सौ. अंजली अर्जुन कावले, अर्जुन यशवंत कावले, सौ. संजना सुनील गावडे, सुनील नारायण गावडे आणि विजय सदाशिव मेस्त्री, सौ.विजयश्री विजय मेस्त्री या पाच जोडप्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू व 5000 रू. चा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. धडे यांनी कामगार कल्याण मंडळाच्या कार्यक्रमांना शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुणे डॉ.केसरे यांनी स्पर्धात्मक होणार्या योजनाचा लाभ सर्वानी घ्यावा. वैद्यकीय मदतीसाठी सहकार्य करू असे सांगितले. सूत्रसंचालन व स्वागत केंद्र संचालक संतोष नेवरेकर यांनी केले. आभार केंद्र प्रमुख सुस्मिता नाईक यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केंद्रसेवक दत्ताराम तळावडेकर व महेंद्र अॅकॅडमीचे विद्यार्थी, केंद्र सभासद यांनी सहकार्य केले.