कुडाळ : पोलिस स्थानक आवारात डंपर समवेत राजन नाईक. 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : कुडाळात डंपर चालकाची मुजोरगिरी

उबाठा सेना तालुकाध्यक्षांसह मुलाच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न; पाठलाग करून डंपर रोखला

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : कुडाळ शहरात बुधवारी आठवडा बाजारा दिवशी भरदुपारी वाळू वाहतूक करणाऱ्या एका डंपरने (चक-07 द 0198) थरार निर्माण केला. कुडाळ- आंबेडकर नगर येथे उभे असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाध्यक्ष राजन नाईक आणि त्यांच्या मुलाच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न झाला. सुदैवाने, स्थानिक ग्रामस्थांनी वेळीच आरडाओरडा केल्याने पिता-पुत्र या जीवघेण्या संकटातून थोडक्यात बचावले.

मोबाईलवर बोलत होता चालक

बुधवारी दुपारी 1 वा. च्या सुमारास बाव-कुडाळ मार्गावर ही घटना घडली. राजन नाईक आपल्या मुलासह आंबेडकरनगर येथे उभे असताना, बाव कडून येणारा एक वाळू डंपर भरधाव वेगाने त्यांच्या दिशेने आला. डंपर चालक मोबाईलवर बोलण्यात मग्न होता. ग्रामस्थांच्या ओरडण्यामुळे चालक काहीसा सावध झाला; मात्र तरीही त्याने डंपरचा वेग कमी न करता कुडाळ पंचायत समितीच्या दिशेने वाहन सुसाट नेले. आपल्या जीवावर बेतलेल्या या प्रसंगानंतर राजन नाईक यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी तत्काळ डंपरचा पाठलाग सुरू केला. आंबेडकरनगर ते गुलमोहर हॉल या मार्गावर थरारक पाठलाग करून श्री.नाईक यांनी डंपरसमोर मोटारसायकल आडवी लावली आणि त्याला रोखून धरले. विशेष म्हणजे, त्या डंपरच्या मागे एका पांढऱ्या कारमधून डंपर मालकदेखील येत होता असे राजन नाईक यांनी सांगितले.

प्रशासकीय यंत्रणेला धरले धारेवर

डंपर रोखल्यानंतर नाईक यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार आणि पोलीस यंत्रणेला याबाबत माहिती देताच तलाठी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. डंपर चालकाने ‌‘माझं चुकलं, मला माफ करा‌’ अशी विनवणी करत हात जोडले. मात्र, संतप्त श्री. नाईक यांनी अधिकाऱ्यांसमोर संताप व्यक्त केला.

विशेष म्हणजे, ज्या मार्गावर ही घटना घडली, त्या बाव-कुडाळ रस्त्यावरील सिद्धिविनायक हॉलमध्ये स्वतः जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होता. एवढी मोठी शासकीय यंत्रणा तैनात असतानाही त्याच मार्गावरून अवैध वाळू वाहतूक करण्याचे धाडस होतेच कसे?असा प्रश्न नाईक यांनी उपस्थित केला आहे.सध्या सदर डंपर कुडाळ पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला असून, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान महसूल विभागाच्या दोन तलाठी कर्मचाऱ्यांनी कुडाळ पोलीस स्टेशन येथे जात त्या डंपरची पाहणी केली असता डंपर वाळुने भरलेला असल्याचे निदर्शनास आले आहे.भरवस्तीत सुसाट सुटलेल्या या डंपरमुळे कुडाळवासीयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT