सिंधुदुर्ग

Sindhudurg : कुडाळ विकास आराखड्याला सुधार समितीची हरकत

७ मुद्द्यांवर न.पं.ला निवेदन; समिती अध्यक्ष प्रसाद शिरसाट यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : नगरपंचायतीच्या प्रारूप शहर विकास आराखड्याला सुधार समिती चॅरिटेबल ट्रस्ट, कुडाळने हरकत घेत शुक्रवारी ७ महत्त्वाच्या मुद्द्यांवर नगरपंचायती प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. सुधार समिती अध्यक्ष प्रसाद शिरसाट यांनी शुक्रवारी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर आणि मुख्याधिकारी विनायक औंधकर यांची भेट घेऊन नागरिकांच्या वतीने हरकत मांडल्या.

कुडाळ नगर पंचायतीने शहराचा विकास आराखडा तयार केला आहे, हा विकास आराखडा हा कुडाळतील नागरिकांसाठी अन्यायकारक आहे, असे आराखडा बघून आमच्या निदर्शनास येते. त्यामुळे विविध मुद्द्यांच्या पुनर्विचार व्हावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सुधार समिती अध्यक्ष प्रसाद शिरसाट यांच्या समवेत बनी नाडकर्णी, सतीश वर्दम व नागरिक उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे, कुडाळ अभिमन्यू हॉटेल ते एसटी डेपोपर्यंत २४ मीटरचा रस्ता दाखविला आहे, हा रस्ता प्रत्यक्षात झाला तर अनेक नागरिकांना बेघर व्हावे लागणार आहे. तसेच अनेकांच्या व्यवसायावर गदा येणार आहे. कुडाळ बाजारपेठेत ९ मीटरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. त्यामुळे कुडाळ बाजारपेठेतील अनेकांचे व्यवसाय व जुनी घरे बाधित होण्याची भीती आहे. नगरपंचायत मालकीच्या मोकळ्या जागा आरक्षित केलेल्या दिसत नाहीत, त्या जागांवर काय विकास होणार ते स्पष्ट दाखवलेले नाही.

यापूर्वीही कुडाळ शहराचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता, त्यावरील नागरिकांच्या हरकतची काय दखल घेण्यात आली? इतर वार्डमधील वस्तुस्थिती जाणून घेऊनच आराखडा आखला जावा. आराखडा आखताना नागरिकांना विश्वासात घेऊन प्रत्यक्ष वस्तुस्थिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. असे केले तरच शहराच्या विकासासाठी नागरिकांचा सहभाग लाभेल. कुडाळ शहराचा काही भाग हा ग्रीन झोनमध्ये दाखविण्यात आला आहे. तो ग्रीन झोन उठविण्यात यावा. शहराचा विकास हा नागरिकांच्या वर्तमान आणि भविष्याच्या उद्दिष्टासाठी असावा, त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करण्यासाठी नसावा, असे सुधार समितीने निवेदनात नमूद केले आहे. उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक अभिषेक गावडे, नयना मांजरेकर उपस्थित होते.

नगरसेवकांनी कर्तव्य झटकून चालणार नाही!

प्रसाद शिरसाट म्हणाले, कुडाळ नगरपंचायतीमध्ये शहर विकासाच्या आराखड्याबाबत सुधार समिती अध्यक्ष या नात्याने लेखी निवेदनाद्वारे हरकती मांडल्या आहेत. परंतु नवीन विकासाच्या आराखड्यामध्ये अनेक चुका दिसत आहेत. शहरामध्ये सतरा वार्ड आहेत. सतरा वार्ड मधून नेतृत्व करणाऱ्या नगरसेवकांनी आपल्या कर्तव्य नात्याने नागरिकांच्या समस्या, नवीन विकसित आराखडामध्ये जे चुकीचे आहे, त्यांना विरोध करून नागरिकांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी स्वीकारावी. नगरसेवकांनी आपले कर्तव्य झटकून चालणार नाही. नागरिकांनी आपल्याला विश्वासाने मतदान केले आहे, हा विश्वास सार्थकी लावावा असे आवाहन प्रसाद शिरसाट यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT