कुडाळ : आमसभेत मार्गदर्शन करताना आ. नौलेश राणे. सोबत जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, माजी आ. शंकर कावळी, सभापती मिलिंद नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आदी 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Kudal - कुडाळ आमसभेत प्रशासनाची 'झाडाझडती'!

Sindhudurg Kudal - कुडाळ आमसभेत प्रशासनाची 'झाडाझडती'!

स्वालिया न. शिकलगार

  • आ. प्रशासन नीलेश राणे यांचा प्रशासनावर सर्जिकल स्ट्राईक

  • कामचुकार अधिकाऱ्यांची थेट सभागृहातून हकालपट्टी

  • रस्ते-वीज-आरोग्य प्रश्नांवर अधिकाऱ्यांना फुटला घाम!

कुडाळ : कुडाळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची दिशा ठरवणारी कुडाळ पंचायत समितीची 'आमसभा' तब्बल सात वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सोमवारी महालक्ष्मी हॉल येथे पार पडली. आ. नीलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेने प्रशासकीय दिरंगाईचा बुरखा टराटरा फाडला. सकाळपासून सुरू झालेली ही सभा म्हणजे केवळ एक बैठक नसून, ती प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी एक 'झाडाझडती' ठरली. तब्बल १२५ निवेदने या सभेत आली. जनतेच्या कामात आडकाठी आणणाऱ्या अधिकाऱ्यांना आ. राणेंनी भर सभागृहात 'घरचा रस्ता दाखवला.

कुडाळ महालक्ष्मी हॉल येथे घेतलेल्या या आमसभेला जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, सभापती मिलिंद नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, माजी आ. शंकर काबळी, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, बांधकाम सभापती संतोष पाटील, आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेलकर, तहसीलदार सचिन पाटील, पो. निरीक्षक राजेंद्र मगदूम, जि. प. सदस्य दिपलक्ष्मी पडते, दिपक नारकर, रुपेश कानडे, संजय पडते, काका कुडाळकर यांसह सर्व विभागांचे खातेप्रमुख, सरपंच आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

प्रशासकीय अकार्यक्षमतेवर आमदारांचा 'विस्फोट'

सभेच्या सुरुवातीलाच दूरसंचार विभागाचे (BSNL) अधिकारी पुरेशी माहिती न घेता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत सभागृहात आले. विचारलेल्या प्रश्नांना नीट उत्तरे देता न आल्याने आणि हिंदी भाषेचा वापर करत सभागृहाची दिशाभूल केल्याने आ. राणे यांचा पारा चढला. जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या या पवित्र सभागृहात तुम्हाला माहीती देता येत नाही, हे आम्ही खपवून घेणार नाही. ज्यांना स्थानिक प्रश्नांची जाण नाही आणि ज्यांना माहिती देता येत नाही, अशा लोकांनी तात्काळ सभागृह सोडावे, अशा कडक शब्दांत सुनावत राणे यांनी त्या अधिकाऱ्याला बाहेर काढले. हा प्रकार पाहून सभागृहात उपस्थित इतर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले.

जमिर्तीच्या आरक्षणावरून सरकारला घरचा आहेर!

कोकणातील आणि विशेषतः कुडाळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या 'जमीन' या जिव्हाळ्याच्या विषयावर आ. राणे अत्यंत अभ्यासपूर्ण बोलले. कोकणात साडेतीन ते चार लाख हेक्टर जमीन केवळ सॅटेलाईट मॅपिंगच्या चुकीच्या पद्धतीमुळे इको-सेन्सिटिव्ह, 'वनसंज्ञा' आणि 'आकारीपड'च्या जाळ्यात अडकली आहे. एसी रूममध्ये बसून केलेल्या सॅटेलाईट मॅपिंगमुळे शेतकऱ्यांचे सात-बारा लाल झाले आहेत. हे आरक्षण अन्यायकारक आहे. मी स्वतः महसूल मंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा केला आहे. ज्या जमिनी चुकीच्या पद्धतीने आरक्षित केल्या आहेत, त्या परत मिळाल्याच पाहिजेत, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. यावेळी महसूल विभागाला त्यांनी स्पष्ट आदेश दिले की, १७०० हेक्टर जमिनीचे जे प्रस्ताव प्रलंबित आहेत, ते तातडीने मार्गी लावावेत.

महावितरण आणि रस्ते विकास: 'ठेकेदारांची खैर नाही

कुडाळ तालुक्यात विजेचा लपंडाव आणि निकृष्ट रस्ते कामे यावर जनतेने प्रश्नांचा पाऊस पाडला. कुडाळसाठी ११ सबस्टेशनची मागणी असताना केवळ ४ प्रस्तावित केल्याबद्दल महावितरणला धारेवर धरले." वेताळ बांबर्डे सारख्या पर्यटन क्षेत्राच्या गावात ३०० पैकी २०० दिवस वीज नसते, मग तिथल्या युवकांनी व्यवसाय कसा करायचा? असा सवाल त्यांनी केला. ३३ केव्ही आणि १२ केव्ही केबल टाकताना खोदकाम करून रस्ते तसेच सोडणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईचे संकेत त्यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पिसाळ यांच्या अनुपस्थितीची दखल घेत त्यांनी थेट सभेतूनच फोन लावून त्यांची 'अरेरावी' खपवून घेणार नसल्याचे सुनावले.

आरोग्य आणि शिक्षण: 'आभाळच फाटलंय तिथे ठिगळ कुठे लावणार?'

आरोग्य विभागाच्या चर्चेवेळी एक धक्कादायक बाब समोर आली. अपघातातील मृतदेहांचे विच्छेदन करण्यासाठी कटर नसल्याने नातेवाईकांना पैसे मोजावे लागतात. ही बाब समजताच आ. राणे यांनी संताप व्यक्त केला. मानवता गहाण टाकणाऱ्या अशा गोष्टी कुडाळात चालणार नाहीत, अशा शब्दांत त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सुनावले. तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर तोडगा म्हणून स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवकांना 'कंत्राटी शिक्षक' म्हणून संधी द्यावी, अशी महत्त्वाची सूचना यावेळी करण्यात आली.

एसटी विभागाची 'दौड' की 'ओझे'?

एसटी आगाराच्या भोंगळ कारभारावर ज्येष्ठ नागरिक सावळाराम अणावकर यांनी प्रशासनाला आरसा दाखवला. बसला बोर्ड नसतो, बस स्थानकात बसायला जागा नाही, मग ही एसटी कुणासाठी? असा प्रश्न त्यांनी केला. आमदार राणे यांनी एसटी विभागाला बीएस-६ च्या नवीन गाड्या मिळाल्या असतानाही सेवा सुधारत नसल्याबद्दल जाब विचारला. सिंधुदुर्गनगरी बसस्थानकाचे विस्तारीकरण आणि शालेय फेऱ्या वेळेत सोडण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना डेडलाईन दिली.

रानमोडीचा विळखा आणि शेतीचे नुकसान

वनविभागाने ३१०० वानरांचे रेस्क्यू केल्याचा दावा केला असला तरी, पिकांच्या नुकसानीचे काय? असा सवाल शेतकऱ्यांनी केला. आ. राणे यांनी वन विभागाला रानमोडीवर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी अहवाल सादर करण्यास सांगितले. जि. प. पशुसंवर्धन उमेद, बालविकास प्रकल्प आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. प्रास्ताविक सभापती मिलिंद नाईक यांनी केले तर आभार प्रफुल्ल वालावलकर यांनी मानले.

आणि आ. राणेंनी थेट पिसाळ यांनाच फोन लावला!

आमसभेत सा. बां. विभागाच्या कामांचा आणि तक्रारींचा पाढा वाचला जात असतानाच, कुडाळचे उपअभियंता श्री. पिसाळ हे सभेत अनुपस्थित असल्याचे आ. नीलेश राणे यांच्या निदर्शनास आले. सा. बां. विभागाच्या ढिसाळ कारभाराबाबत लोकांच्या तक्रारींचा डोंगर समोर असताना जबाबदार अधिकारीच गायब असल्याने आमदार चांगलेच संतापले. त्यांनी विलंब न लावता सभागृहातूनच श्री. पिसाळ यांना फोन लावला आणि सर्वांसमोर त्यांची कानउघडणी केली. "तुम्ही बैठकीला का आला नाही? तुमच्याबद्दल लोकांच्या एवढ्या तक्रारी आहेत, तुमची कसली अरेरावी चालली आहे? आमच्याकडे तुम्ही नीट वागायचं, तरच आम्हाला भेटायला या," अशा कडक शब्दांत राणे यांनी त्यांना ठणकावून सांगितले. या अनपेक्षित प्रकारामुळे सभागृ-हातील इतर अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली. श्री. पिसाळ हजर झाल्यानंतर त्यांची स्वतंत्र बैठक घेऊन जाब विचारण्याचे आदेश आ. राणे यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले

नागरिक सावळाराम अणावकर यांनी प्रशासनाला आरसा दाखवला. बसला बोर्ड नसतो, बस स्थानकात बसायला जागा नाही, मग ही एसटी कुणासाठी? असा प्रश्न त्यांनी केला. आमदार राणे यांनी एसटी विभागाला बीएस-६ च्या नवीन गाड्या मिळाल्या असतानाही सेवा सुधारत नसल्याबद्दल जाब विचारला. सिंधुदुर्गनगरी बसस्थानकाचे विस्तारीकरण आणि शालेय फेऱ्या वेळेत सोडण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना डेडलाईन दिली.

रानमोडीचा विळखा आणि शेतीचे नुकसान

वनविभागाने ३१०० वानरांचे रेस्क्यू केल्याचा दावा केला असला तरी, पिकांच्या नुकसानीचे काय? असा सवाल शेतकऱ्यांनी केला. आ. राणे यांनी वन विभागाला रानमोडीवर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी अहवाल सादर करण्यास सांगितले. जि. प. पशुसंवर्धन उमेद, बालविकास प्रकल्प आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. प्रास्ताविक सभापती मिलिंद नाईक यांनी केले तर आभार प्रफुल्ल वालावलकर यांनी मानले.

विकासाचे ठराव आणि स्वागतार्ह पावले

सभेत केवळ टीकाच झाली नाही, तर चांगल्या कामांचे कौतुकही झाले. कुडाळ एमआयडीसी सुशोभीकरणासाठी निधी दिल्याबद्दल नकुल पार्सेकर यांनी मांडलेला अभिनंदन ठराव मंजूर करण्यात आला. तसेच, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात बाजी मारणाऱ्या शाळांचे दीपक नारकर यांनी अभिनंदन केले. कोकणातील महत्त्वाचा कोल्हापूर-घोडगे-सोनवडे घाट रस्ता, जो ४० वर्षे रखडला होता, त्या कामाला गती दिल्याबद्दलही सरकारचे आभार मानण्यात आले. केंद्राने आणलेल्या 'नारी शक्ती विधेयकाला महाविकास आघाडीने विरोध केल्याचा निषेध ठराव जि. प. सदस्या दिपलक्ष्मी पड़ते यांनी मांडला. नेरुर- ठाकुरवाडी येथील 23 नंबरला नोंद असलेला रस्ता बंद केला, याबाबत एका महिलेने सभेत प्रश्न केला, यावेळी रस्ता खुला करून दिला जाईल असे आ.राणे यांनी सांगितले. तसेच कुडाळ तालुक्यात 32 रस्ते पानंद योजनेत घेणार असे तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT