कुडाळ : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सवासाठी गावी आलेले मुंबईकर चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. कोकण रेल्वेसह एसटी बसेसच्या माध्यमातून चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी आगाराच्या एसटी बसेस मुंबईला पाठविल्याने कुडाळ एसटी आगाराचे वेळापत्रक विस्कळीत झाले. शनिवारी या आगाराच्या अनेक ग्रामीण फेर्या अचानक रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. यामुळे बसस्थानकात प्रवाशी, चाकरमान्यांचा खोळंबा झाला. बहुतांशी गाड्या निर्धारित वेळेपेक्षा विलंबाने धावत होत्या.
गणेशोत्सवासाठी मुंबईकर चाकरमानी गणेशभक्त मोठ्या प्रमाणात गावी दाखल झाले होते. गौरी- गणपती विसर्जनानंतर चाकरमानी मुंबईला परतीच्या प्रवासाला लागले आहेत. कोकण रेल्वेसह एसटी बसेसने चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. कोकण रेल्वे प्रशासनाकडून जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तरीही रेल्वे हाऊसफुल्ल गर्दीने धावत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकांवरही प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे.
त्याचबरोबर एसटी प्रशासनाकडूनही मुंबईकर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी ज्यादा एसटी बसेस सिंधुदुर्ग विभागातून सोडण्यात आल्या आहेत. गौरी-गणपती विसर्जनानंतर या बसेस चाकरमन्यांना घेऊन मुंबईला रवाना केल्या जात आहेत. कुडाळ आगारातूनही चाकरमान्यांच्या दिमतीला एसटी बसेस मुंबईला पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे कुडाळ एसटी आगाराचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. शनिवारी या आगारातून तालुक्याच्या ग्रामीण भागात सुटणार्या काही बसफेर्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात प्रवाशांची गैरसोय झाली. काही बसफेर्या विलंबाने धावत होत्या. त्यामुळे एसटी बसेसच्या प्रतीक्षेत प्रवाशी, मुंबईकर चाकरमान्यांना बसस्थानकात ताटकळत राहावे लागले. येथील बसस्थानकात प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला. शहरात आलेले तसेच नातेवाईकांकडे गणेश दर्शनासाठी जाणार्या येणार्या प्रवाशांचे हाल झाले. वेळेत गाड्या नसल्याने काही प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. यात त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.