कोकणातील पहिले नाचणी खरेदी केंद्र वैभववाडीत! 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Ragi Procurement : कोकणातील पहिले नाचणी खरेदी केंद्र वैभववाडीत!

शासन हमीभावाने प्रतिक्विंटल ५२०५ रुपयांनी नाचणी खरेदी; शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी करण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

वैभववाडी : जिल्ह्यातीलच नव्हे, तर कोकणातील पहिले नाचणी खरेदी केंद्र वैभववाडी तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रावर शासनाच्या आधारभूत किमतीनुसार प्रतिक्विंटल ५२०५ रुपये दराने नाचणी खरेदी केली जाणार आहे. पालकमंत्री नीतेश राणे यांनी यासाठी पाठपुरावा करून पणन महासंघाकडे मागणी केली होती. या केंद्राचा जिल्ह्यातील नाचणी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाचणी पिकाची ई-पीक नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैभववाडी तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रमोद रावराणे यांनी केले.

वैभववाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संघांचे सचिव सिद्देश रावराणे उपस्थित होते. श्री. रावराणे म्हणाले, वैभववाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात नाचणी उत्पादन घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या आधारभूत किमतीने नाचणी विक्री करता यावी, यासाठी खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. या पाठपुराव्याला यश आले असून, नाचणीला प्रतिकिलो ५२ रुपये ५ पैसे दर मिळणार आहे. नाचणी विक्री केल्यानंतर २४ तासांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना या केंद्रावर नाचणी विक्री करता येणार आहे. यासाठी नाचणी व भात पिकाची ई-पीक नोंदणी ११ नोव्हेंबरपर्यंत करणे बंधनकारक आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही वैभववाडी तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून वैभववाडी व करूळ येथे भात खरेदी केली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी संघाकडे ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी करताना आधार कार्ड, फार्मर आयडी, सातबारा उतारा, पीकपाणी नोंद, बँक पासबुक आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक ही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

शेतकऱ्यांमध्ये भात व नाचणी खरेदीबाबत जनजागृती करण्यासाठी संघाचे सर्व संचालक २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत तालुक्यातील गावांना भेटी देणार आहेत. यावेळी विकास संस्था व ग्रामपंचायतींना भेट देऊन खरेदी प्रक्रियेची माहिती दिली जाणार आहे. शासनाने भातासाठी प्रतिक्विंटल २४४१ रुपये, तर नाचणीसाठी प्रतिक्विंटल ५२०५ रुपये हमीभाव निश्चित केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT