Konkan Railway issues
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गसह जिल्ह्यातील दहा रेल्वे स्थानकांवरील पाणी, सांडपाणी, वाढलेली झाडेझुडपे, रस्त्यांची दुरवस्था आणि इतर मूलभूत सुविधांच्या प्रश्नांबाबत कोकण रेल्वे प्रवासी संघटनेला पुन्हा जनआंदोलनाचा मार्ग पत्करावा लागत आहे. दरम्यान, गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना चार दिवसांत या समस्या सोडवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत, कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश पावसकर यांनी गेल्या वर्षभरात सातत्याने केलेल्या मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. सिंधुदुर्गसह दहा स्थानकांवर पाणी, स्वच्छता, शौचालय, तिकीट बुकिंग, अप्रोच रोड, थांबा देणाऱ्या गाड्यांचे बोर्ड, वाढलेली झाडेझुडपे, मोडलेली बाकडी, अशा विविध समस्या प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवासाठी २५६ विशेष गाड्या सोडण्यात आल्या असल्या तरी प्रवाशांना तिकीट मिळण्यात अडचणी येत आहेत. काही गाड्या सिंधुदुर्ग, वैभववाडी, नांदगाव या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबत नाहीत, या मागण्यांकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. प्रशासनाकडून वेळकाढूपणा सुरू असल्यास, निधीची कमतरता असल्यास, प्रवासी संघटना भीक मागो आंदोलन छेडेल, असा इशारा पावसकर यांनी यावेळी दिला.
जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने स्वच्छता, पाणी, शौचालय आदी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले. काही मागण्या भारतीय रेल्वेच्या अखत्यारीतील असल्याने त्या वरिष्ठांकडे पाठवण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी रेल्वे प्रशासनाचे रिजनल मॅनेजर शैलेंद्र बापट, वाहतूक अधिकारी शैलेंद्र आंबाडेकर, पीआरओ सचिन देसाई, कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष समितीचे पदाधिकारी व विविध गावांचे सरपंच, अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर सिंधुदुर्ग स्टेशनची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे ठरले. रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास, प्रवासी संघटना रेल रोको किंवा भीक मागो आंदोलन छेडेल, असा इशारा संघटनेने दिला आहे.