सावंतवाडी : कोकण रेल्वे मार्गावर २२ नोव्हेंबरच्या रात्री जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याने संपूर्ण मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. मडगाव ते मुंबई सीएसएमटी दरम्यान धावणाऱ्या १२०५२ जनशताब्दी एक्स्प्रेसचे इंजिन बिघडल्याने ही गाडी मोठ्या विलंबाने धावली. या बिघाडाचा थेट परिणाम कोकणकन्या आणि तेजस एक्स्प्रेससह अन्य अनेक रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर झाला असून, प्रवाशांना प्रवासादरम्यान विलंब आणि गैरसोयीचा सामना करावा लागला. एकाच वेळी तांत्रिक बिघाड आणि विविध विभागांतील ब्लॉक सुरू असल्याने रेल्वे वाहतुकीचे नियोजन विस्कळीत झाले आहे.
२३ नोव्हेंबर रोजी सकाळच्या अपडेटनुसार, २०१११ कोकणकन्या एक्स्प्रेस रत्नागिरी स्थानकातून सुमारे १ तास ४५ मिनिटे उशिराने रवाना झाली. त्यामुळे कुडाळ, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडीकडे जाणाऱ्या प्रवाशांना ही गाडी सुमारे दीड तास विलंबाने पोहोचली. गाडीच्या प्रत्यक्ष धावण्याच्या स्थितीनुसार पुढील स्थानकांवरील विलंबात बदल होऊ शकतो. तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे प्रशासनाला काही गाड्यांचे नियमन करावे लागल्याने प्रवाशांच्या नियोजित प्रवासात अडथळे आले.
संगमेश्वर-उक्षी रेल्वे विभागात आपत्कालीन अभियांत्रिकी आणि विद्युत विभागाचा ब्लॉक घेण्यात आला होता. उपलब्ध माहितीनुसार, हा ब्लॉक सकाळी ७.४० ते ९.१५ वा. या वेळेत घेण्यात आल्याने रेल्वे वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात आले आणि काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल व विलंब झाला. याशिवाय दिवा–पनवेल विभागात २२ नोव्हेंबरपासून २९ नोव्हेंबरपर्यंत दररोज रात्री १.५० ते पहाटे ४.०५ वा.पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येत आहे. या ब्लॉकमुळे कोकण तसेच दक्षिण भारताकडे जाणाऱ्या गाड्यांना नियमन, थांबा किंवा विलंबाचा सामना करावा लागू शकतो.
तेजस एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावरही या विलंबाचा परिणाम झाला आहे. २२१२० तेजस एक्स्प्रेस उशिराने मडगाव येथे पोहोचल्याने तिच्या परतीच्या फेरीवर परिणाम झाला. कोकण रेल्वेच्या माहितीनुसार २२११९ ही गाडी सुमारे सहा तास उशिराने रवाना झाल्याने प्रवाशांना मोठा विलंब सहन करावा लागला. दुसरीकडे, प्रवाशांच्या सोयीसाठी कणकवली रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्र. २ येथे नवीन प्रवासी निवारा शेड सुरू करण्यात आले आहे. ऊन आणि पावसापासून संरक्षण मिळण्यासह गाडीची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना या शेडचा मोठा दिलासा मिळणार असून, स्थानकांवरील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.