सावंतवाडी : कोकण रेल्वेचे स्वप्न ज्यांच्या दूरदृष्टीतून साकार झाले, ते कोकण रेल्वेचे शिल्पकार दिवंगत प्रा. मधु दंडवते यांचे नाव आता 'सावंतवाडी रोड' रेल्वे स्थानकाला देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी देण्यात आली. 'कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी'ने गेल्या अनेक महिन्यांपासून दिलेल्या प्रखर लढा आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले आहे.
रस्त्यावरील लढाई ते मंत्रालयातील वाटाघाटी
हा निर्णय सहजासहजी मिळालेला नाही. जानेवारी २०२४ मध्ये संघटनेने आक्रमक पवित्रा घेत प्रजासत्ताक दिनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला. १८ जानेवारी २०२४ रोजी महसूल विभागाने रेल्वेला यासंदर्भात निर्देश दिले. पुढे २३ ऑगस्ट रोजी रेल्वेने स्पष्ट केले की, नामांतराचा अधिकार राज्याचा आहे. हा तांत्रिक मुद्दा समजताच संघटनेने आपला मोर्चा मंत्रालयाकडे वळवला.
राजकीय इच्छाशक्ती आणि संघटनेचा रेटा
या यशात लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा आणि प्रवासी संघटनेची चिकाटी महत्त्वाची ठरली. पालकमंत्री नितेश राणे यांची १८ मे रोजी संघटनेने भेट घेतली असता त्यांनी 'लवकरच गोड बातमी मिळेल' असे आश्वासन दिले होते, जे अवघ्या चार दिवसांत पूर्ण झाले. माजी मंत्री रवींद्र चव्हाण व माजी मंत्री दीपक केसरकर यांनी देखील वेळोवेळी उच्चस्तरीय बैठका आणि जनता दरबाराच्या माध्यमातून हा विषय मार्गी लावण्यासाठी सहकार्य केले.
या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, खा. नारायण राणे यांच्यासह सर्वपक्षीय आमदारांचे आणि खासदारांचे संघटनेने आभार मानले आहेत. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला प्रा. मधु दंडवते यांचे नाव मिळाल्याने संपूर्ण कोकणात आनंदाचे वातावरण आहे.