सावंतवाडी : कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या विलंबाचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणारी 11099 कुर्ला-मडगाव एक्स्प्रेस ही गाडी गेल्या काही काळापासून सातत्याने उशिराने धावत असल्याने कोकणवासीयांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मध्यरात्री 00:45 वा. सुटणारी ही गाडी कोणतीही ठोस कारणे नसताना पहाटे 5 ते 6 वा.पर्यंत रोखून धरली जात असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
अनेक प्रवासी दोन महिने आधी तिकीट आरक्षित करतात, जेणेकरून रात्रीचा प्रवास करून सकाळी लवकर गावी पोहोचता येईल. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे प्रवाशांना संपूर्ण रात्र रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मवर जागून काढावी लागत आहे. विशेषतः वृद्ध, महिला आणि लहान मुलांचे यामुळे प्रचंड हाल होत आहेत.
मडगाव एक्स्प्रेस तिच्या निर्धारित वेळेतच (00:45 वा.) सोडण्यात यावी. गाडी उशिरा सुटणार असेल तर प्रवाशांना किमान 4-5 तास आधी कळवावे. कोकण रेल्वे मार्गावर जाणीवपूर्वक होणारा विलंब टाळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करावा. जर लवकरच या परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर कोकणातील प्रवासी आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत.