कुडाळ : कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी मुंबईहून मडगावला जाणारी कोकणकन्या एक्स्प्रेस शनिवारी निर्धारीत वेळेपेक्षा उशिराने धावली. सकाळी ८.२४ वाजता निर्धारीत वेळेत कुडाळ रेल्वे स्थानकावर पोचणारी कोकणकन्या एक्सप्रेस तब्बल नऊ तास उशिराने सायंकाळी ५.३९ वाजता कुडाळ रेल्वेस्थानकात पोचली. ही गाडी उशिराने धावल्याने प्रवाशांना रखडत रखडत प्रवास करावा लागला. मडगावला जाणारी गाडी उशिरानेच धावल्याने परत रात्री मडगावहून मुंबईला जाणारी कोकणकन्या एक्स्प्रेसही उशिराने धावण्याची शक्यता निर्माण झाली. रेल्वे प्रशासनानेही तसा दुजोरा दिला. त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री अकरा वाजता सुटणारी कोकणकन्या एक्स्प्रेस शुक्रवारी रात्री निर्धारीत वेळेपेक्षा उशिराने सुटली. मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास सुटलेली गाडी कुडाळ रेल्वे स्थानकात शनिवारी सायंकाळी ५.३९ वाजताच्या सुमारास दाखल झाली. ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकात क्राॅसिंगसाठी गाडी थांबविण्यात आली. त्यामुळे या गाडीला आणखी विलंब झाला. गाडी सुटण्यास उशिर का झाला? याबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही ठोस माहीती देण्यात आली नसल्याचे या गाडीतून प्रवास करणा-या प्रवाशांकडून सांगण्यात आले. त्यामुळे प्रवाशांमध्येही मोठा संभ्रम होता. मुंबईहून मडगावला सकाळी येणारी ही गाडी परत त्याच दिवशी रात्री मुंबईला कोकणकन्या एक्सप्रेस म्हणूनच सोडली जाते. मात्र मुंबईहून मडगावकडे जाणारीच गाडी उशिराने धावल्याने परत मुंबईला जाणारी गाडीही दोन तास विलंबाने धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. कोकणकन्या एक्सप्रेसचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांचे हाल झाले. सकाळी मडगाव कडे जाणारे तसेच रात्री मुंबईला जाणा-या प्रवाशांना गाडीच्या प्रतिक्षेत रेल्वे स्थानकावर ताटकळत उभे राहावे लागले. त्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान कोकण रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला असता, मडगावहून मुंबईला जाणारी मांडवी एक्सप्रेस, मुंबईत पोचल्यानंतर त्याच दिवशी रात्री कोकणकन्या एक्सप्रेस म्हणून तीच गाडी मडगावला सोडली जाते. मात्र शुक्रवारी मुंबईला जाणारीच मांडवी एक्सप्रेस निर्धारीत वेळेपेक्षा उशिराने पोचली. त्यानंतर गाडीची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर मुंबईहून कोकणकन्या एक्सप्रेस मडगावकडे सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले.