गणेश जेठे
सिंधुदुर्ग ः इकडे कोकणात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला असला तरी शुक्रवारी जाहीर होणाऱ्या मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांच्या निवडणूक निकालाकडे कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे. लाल मातीतल्या मालवणी माणसाची उत्कंठा वाढीस लागली आहे.
मुंबई आणि कोकण यांचे घट्ट नाते असून अनेक कोकणातील राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मुंबईत उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाण मांडून होते. एवढेच नव्हे तर अनेक कोकणचे सुपुत्र जे मुंबईमध्ये आपले करिअर घडविण्यासाठी गेले आहेत असे अनेकजण वेगवेगळ्या पक्षांकडून या महानगरपालिकांच्या रणांगणात उमेदवार म्हणून उतरले आहेत. आपल्या गावचा, आपल्या वाडीतला अगदी आपल्या घरातला हा उमेदवार विजयी होतो का याची उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक रणांगणात असे 66 वॉर्ड आहेत ज्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातील सुपुत्र असलेल्या चाकरमान्यांचा प्रभाव असल्याची माहिती मिळाली आहे.
कोकणातील प्रत्येक घरातील किमान एक माणूस मुंबईत राहतो, तिथे व्यवसाय करतो आणि तो मुंबई आणि ठाण्याचा नागरिक बनलेला आहे. गेली अनेक दशके मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून कोकणी माणूस मोठ्या संख्येने निवडून येत राहिला आहे. मुंबईतील मराठी टक्का कमी झाल्याचे सांगण्यात येत असले तरीदेखील निवडणुकीत उतरणाऱ्या कोकणी सुपुत्रांची संख्या काही घटलेली दिसत नाही. या निवडणुकीतही मुंबई आणि ठाण्यामध्ये अनेक कोकणचे सुपुत्र उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते.
कोकणातील एखाद्या गावातील, एखाद्या वाडीतील अनेक चाकरमानी मुंबईत विशेषतः एखाद्या एरियामध्ये राहतात. त्यामुळे एखाद्या वॉर्डमध्ये अनेक मतदार जसे कोकणातले असतात तसे ते कोकणातील एका त्या गावाचे सुपुत्र असतात. त्यामुळे कोकणातल्या त्या गावातल्या कार्यकर्त्याचा प्रभाव मुंबईत राहणाऱ्या त्या विशिष्ट वॉर्डमधील मतदारांवर असतो. हे माहीत असलेले राजकीय पक्ष अशा गावाकडच्या कार्यकर्त्यांना मुंबईकडे प्रचारासाठी बोलवू लागले आहेत.