शंकर कोराणे
दुकानवाड : कोकणातील शेती आणि फळबागा वन्य प्राण्यांच्या कचाट्यातून वाचवायच्या असतील तर वनखात्याच्या अखत्यारित असलेल्या परिसरात वन्य प्राण्यांच्या आवडत्या वनस्पतींची लागवड करणे आणि नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत (झरे) निर्माण करणे हाच एकमेव उपाय असल्याचे वयोवृद्ध जाणकारांचे मत आहे.
अलीकडे पंधरा-वीस वर्षात मानव आणि वन्यप्राण्यातला संघर्ष शिगेला पोहोचला आहे. ही संघर्षाची ठिणगी पडण्याला कारण वन्य प्राणी नसून संपूर्णतः मानव जात आहे. पण हे वास्तव तो मानायला तयार नाही. जंगलात जाऊन तुम्ही त्यांचं आवडतं खाद्य असणार्या वनस्पतींची तोडणी केली. जंगलांना वणवे लावून तृणभक्षक प्राण्यांचे खाद्य जाळून टाकले. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी त्या प्राण्यांच्या शिकारी करून मांसभक्षक प्राण्यांचे खाद्य हिरावून घेतले.
जंगलातील पारंपारिक पाण्याचे जलस्त्रोत साफ करून ते जिवंत करण्याचे कामी अक्षम्य दुर्लक्ष केले. खनिजांसाठी जंगल उत्खनन करून त्यांचा नैसर्गिक अधिवास असुरक्षित करून टाकला. यामुळे वन्यप्राण्यांचे जंगलातील जीवन असह्य बनल्याने त्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला, याला जबाबदार वन्य प्राणी की मानव? एखादा प्राणी किंवा पक्षी आपल्याला मारक किंवा आर्थिक दृष्ट्या तोट्याचा ठरत असेल तर त्यांना संपवून टाका ही भाषा वापरत आहे. सर्व प्राणीमात्रावर,पशु पक्षावर, किडा मुंगीवर दया करा. हाच आपला खरा धर्म असे माणूस प्रवचनातून, कीर्तनातून, अभंगवाणीतून सांगतो पण प्रत्यक्ष व्यवहारात विरुद्ध दिशेने प्रवास करतो. तसं पाहिल्यास, मानवी मन हे कोणत्या क्षणी, कोणत्या दिशेला सरकेल ते सांगता येत नाही. कोल्हापूरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तीण गुजरातला नेताच, संपूर्ण कोल्हापूर जिल्हा तिच्या प्रेमापोटी एका क्षणात एकत्र आला.पण मुंबईतील दादरचा कबूतरखाना, तेथील रहिवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरत असल्याचे समजताच कबुतराना खाद्य घालणार्यांना शिक्षा करा, असा मतप्रवाह तयार झाला.
आता माकडांची संख्या कमालीने वाढली आहे. वृक्षतोडीला परवानगी देत असताना आपण कोणती झाडे तोडण्यास परवानगी देतो, याचा विचार करायला पाहिजे होता. केवळ फायदा समोर ठेवत, लाकूड ठेकेदाराने त्या वृक्षाचा घेर किती व लांबी किती याचा विचार केला. पण भविष्यात त्याचे दूरगामी परिणाम काय होतील याचा विचार कोणी केला नाही. आता जंगलातील माकडांचं खाद्य संपल्यामुळे त्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीजवळ असलेल्या फळझाडांच्या दिशेने वळवला आहे. त्यांचा सुरक्षित नैसर्गिक अधिवास कोणी उध्वस्त केला? चुका आपण करायच्या मग शिक्षा त्यांना का, असं कोणी विचारलं तर आपल्याकडे उत्तर आहे का? तीच गत रानगवे, नीलगायी, रानडुक्कर या तृणभक्षक प्राण्यांची झाली आहे. त्यांना सुद्धा माकडा प्रमाणे जंगलात खाद्य मिळत नाही. त्यामुळे त्यांचा संचार मानवी वस्तीच्या दिशेने सरकत आहे. त्यांचा सर्वात जास्त उपद्रव उन्हाळ्याच्या दिवसात होतो. या काळात जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटलेले असतात. त्यामुळे पाण्याच्या शोधार्थ ते नद्यांच्या दिशेने वाटचाल करतात. त्यांच्या मार्गात मानवी वस्त्या आणि पिके येतात. मग समोर दिसतो तो चारा आहे आणि भूक लागल्यावर तो खाणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे इतकच त्याला माहीत असणार हे निश्चित.
दुसरी धोकादाय गोष्ट म्हणजे वाघ, बिबट्या आदी हिंस्त्र प्राण्यांचा मानवी वस्तीतील वावर म्हणावा लागेल. ससा, हरिण, सांबर आदी तृणभक्षक प्राण्यांच्या शिकारी कोणी केल्या? वाघासारख्या मांसभक्षक प्राण्यांचं ते अन्न आहे. त्यांचं अन्न, तुम्ही शिकारीला जाऊन संपवल्याने त्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला यात चूक कोणाची? लक्षात ठेवा निसर्गचक्रात पशु - पक्षी किंवा प्राणी कधीच चुकत नाहीत. चुकतो तो केवळ माणूस. मग कर्माची फळ भोगावे लागणार ती मानवालाच. त्रास आपण द्यायचा, यातना त्यांनी भोगायच्या अन उलट म्हणायचं आम्हाला त्याना बंदुकीने मारण्याची परवानगी द्या. हा कोणत्या युगातला न्याय? आहे. लक्षात ठेवा : निसर्गात प्रत्येक प्राणी, पशु- पक्षी महत्त्वाचा आहे. प्रत्येक जण एकमेकांवर अवलंबून आहे. जसं नर आणि मादीच्या मिलनातून नवीन जीव जन्माला येतो तसा प्रकार केवळ पशुपक्षी आणि प्राणीमात्रातच नव्हे तर धनधान्य व फळांबाबतीतही असत.
पीक आणि फळझाडांच्या फुलोर्यावरील स्त्रीकेसर आणि पुंकेसर यांच्या मिलनातून परागीभवन प्रक्रिया जेव्हा पार पडते तेव्हाच पिकाचा दाणा किंवा झाडाचे फळ जन्माला येते. या स्त्रीकेसर आणि पूकेसर यांच्या मिलनाचं काम पक्षी, प्राणी, कीटक, किडा, मुंगी, वारा, मधमाशी कोणताही मोबदला न घेता करत असतात. म्हणूनच आपण शेतातलं धान्य व झाडावरची फळे खातो. जंगलातील सामाजिक वनीकरणाचे 90 टक्के काम दरवर्षी वारा आणि हे वरील सर्व घटक, न सांगता, विना मोबदला करत असतात. म्हणून आपली जैवविविधतील अन्नसाखळी टिकून आहे.
केवळ दोन-चार वर्ष वनवे लावण्यावर कडक निर्बंध घातले, दर्याखोर्यात पारंपारिक जलस्त्रोत पुन्हा पुनर्जीवित केले, पावसाळ्याच्या तोंडावर,पशु पक्षांना आवडणार्या फळांच्या आणि वन झाडांच्या असंख्य प्रकारच्या बिया नुसत्या फेकून जरी दिल्या आणि त्यातील 50 टक्के बिया जरी रुजल्या तरी या वन्य प्राण्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न सुटेल. या कामी शासनाने सकारात्मक पाऊल तात्काळ उचलले पाहिजेत. भविष्यात वन्य प्राणी आणि मानव यातील संघर्षाची धार कमी करावयाची असेल तर कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावीच लागेल.
शासनानं निर्माण केलेलं मानव निर्मित वनखात दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून केवळ 10 टक्के सामाजिक वनीकरण करत असत.केवळ पैशाच्या स्वार्थाने झपाटलेल्या माणसाला हे कोण सांगणार? बैलगाडी खालून चालणार्या कुत्र्याला, गाडी बैलांच्या मुळे नव्हे तर माझ्यामुळेच पुढे सरकत आहे असं वाटत असतं. त्यातलाच हा प्रकार म्हणावा लागेल.