कोकण विकासाला बूस्टर! 
सिंधुदुर्ग

Konkan development : कोकण विकासाला बूस्टर!

1,000 एकरांवर उभारणार भव्य शिपयार्ड; मुंबई वॉटर मेट्रो दोन वर्षांत धावणार ः मंत्री नितेश राणे

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : कोकणातील बंदर विकासाला गती देण्यासाठी तब्बल एक हजार एकरांहून अधिक क्षेत्रावर भव्य शिपयार्ड प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, विजयदुर्ग येथे मोठ्या कंपन्यांचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहेत. जलवाहतुकीसाठी शासनाने 7,600 कोटी रुपयांची मोठी तरतूद केली असून, बहुचर्चित मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्प येत्या दोन वर्षांत सुरू होईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी विधिमंडळात केली.

कोकणच्या 877 कि.मी. किनारपट्टीचा सर्वांगीण विकास आणि स्थानिकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ करणे हे शासनाचे मुख्य ध्येय असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. विधिमंडळात कोकणच्या विकासावरील अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.

मच्छीमारीला आता कृषीचा दर्जा

मंत्री राणे म्हणाले की, मच्छीमार बांधवांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मच्छीमारीला कृषीचा दर्जा दिला असून, यामुळे त्यांना शेतकऱ्यांप्रमाणेच सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जहाज बांधणी व दुरुस्तीचे स्वतंत्र धोरण राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. याशिवाय, सिंधुदुर्गात स्वतंत्र मत्स्य विद्यापीठ उभारण्यात येत आहे. वेंगुर्ले येथे 60 कोटी रुपये खर्चून मत्स्यबीज केंद्र सुरू होत असून, रो-रो बोटींचे थांबे रत्नागिरीसह सिंधुदुर्गातही वाढवले जाणार आहेत.

अनधिकृत मासेमारीवर ड्रोनची नजर

विनाशकारी एलईडी मासेमारीवर कठोर कारवाई सुरू आहे. समुद्रात गस्त घालण्यासाठी 15 अत्याधुनिक स्टील गस्ती नौका आणि 10 ड्रोन मागवण्यात आले आहेत. तसेच, मिरकरवाडा येथे 22 कोटींच्या निधीतून आधुनिक सुविधा उभारल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT