दोडामार्ग : कोल्हापूर-पणजीकडे एसटी बस रविवारी प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरली. ही बस प्रथम चंदगड तालुक्यातील आमरोळी येथे बंद पडली व त्यानंतर दोडामार्ग येथे पंक्चर झाली. परिणामी, प्रवाशांना नाहक त्रास करावा लागला. वारंवार अशा बिघाड झालेल्या बसेस डेपोतून जाणून-बुजून सोडण्यात येत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांमधून उमटत होत्या. या बस तिलारी घाटातून प्रवास करत असल्याने आगार व्यवस्थापकांनी प्रवाशांच्या जीवाशी न खेळता उत्तम बसेस सोडण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
कोल्हापूर-तिलारी घाटमार्गे दोडामार्ग व पणजी जाणाऱ्या अनेक एसटी बसेस आहेत. मात्र, या बसेस आता प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. रविवारी स. 7.30 वा. कोल्हापूर-पणजीला एसटी प्रवासाला निघाली. ही बस प्रथम चंदगड तालुक्यातील आमरोळी येथे दुपारी 12 वा.च्या सुमारास बस बंद पडली. यामुळे सर्वच प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. अखेर तासाभरानंतर बस सुरू करून ती पुढे सोडण्यात आली. मात्र प्रवाशांचा हा त्रास इथेच थांबला नाही.
आमरोळीतून कसाबसा प्रवास करत बस दोडामार्ग येथे पोहोचली असता दुपारी 3.40 वा.च्या सुमारास ही बस पंक्चर झाली. एकाच प्रवासात दोन वेळा अशा घटना घडल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला. काही प्रवाशांनी एसटी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे, गेल्या दहा दिवसांत अशा प्रकारे या मार्गावरील एसटीबस चार वेळा बंद पडल्याची माहिती आहे. कोल्हापूरहून दोडामार्ग व पणजीकडे येणाऱ्या अनेक एसटी फेऱ्या अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.