Trupti Dhodmise 
सिंधुदुर्ग

Trupti Dhodmise : तांत्रिक त्रुटी दूर करून नागरिकांना गतीने सेवा द्या!

तृप्ती धोडमिसे : सेतू व व्हीएलई चालकांच्या विशेष प्रशिक्षण बैठकीत आश्वासन; ‘गव्हर्नन्स प्रोसेस

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : 'आपले सरकार' पोर्टलवर सेवांमध्ये तांत्रिक सुलभता आणि गती आणण्यासाठी अंमलात आलेल्या 'गव्हर्नन्स प्रोसेस री-इंजिनिअरिंग' च्या अंमलबजावणीत सेतू केंद्र आणि व्हीएलई चालकांना येणाऱ्या अडचणींची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करताना किंवा रिझोल्युशनच्या ज्या काही साध्या-साध्या तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत, त्या जिल्हा पातळीवर तात्काळ सोडवल्या जातील. ज्या अडचणी आमच्या अखत्यारीत नाहीत, त्या धोरणात्मक निर्णयासाठी राज्य शासनाकडे पाठवून मार्गी लावू , असे आश्वासन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.

महाआयटी मुंबईच्या सूचनेनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयातील मायनाक भंडारी सभागृहात जिल्ह्यातील सेतू आणि व्हीएलई चालकांसाठी एका विशेष प्रशिक्षण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत कणकवली तहसीलदार तथा मास्टर ट्रेनर दीक्षांत देशपांडे यांनी दाखल्याबाबत अडीच तास सविस्तर मार्गदर्शन केले. याचदरम्यान जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी उपस्थिती दर्शवत मार्गदर्शन केले. ​या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी आरती देसाई, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती वराहे, कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर, कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील, वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी, कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे आणि महाआयटीचे जिल्हा प्रकल्प प्रमुख रुपेश कुणकवळेकर यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महसूल सहायक आणि सेतू व व्हीएलई चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​'प्रशासनाचा तुमच्या पाठीशी खंबीर पाठिंबा'

अतिशय कमी कालावधीच्या पूर्वसूचनेवर सर्व व्हीएलई आणि सेतू चालक या बैठकीला उपस्थित राहिल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले. त्या म्हणाल्या, जीपीआरच्या अंमलबजावणीनंतर अनेक विषय पुढे आले होते. परवाच मी स्वतः दोन सेंटर्सला भेट देऊन प्रत्यक्ष काम पाहिले. तेव्हा अपलोडिंग आणि तांत्रिक बाबींमध्ये येणाऱ्या अडचणी आमच्या लक्षात आल्या. त्यामुळेच आपल्या सर्वांशी थेट संवाद साधणे आवश्यक होते. आजच्या या बैठकीत तुमच्या स्तरावरील आणि आमच्या स्तरावरील बऱ्याच शंकांचे निराकरण झाले आहे.

​महसूल विभागावर कामाचा ताण, तरीही 'जीपीआर'ला प्राधान्य!

महसूल प्रशासनाच्या व्यस्ततेवर प्रकाश टाकताना जिल्हाधिकारी म्हणाल्या, महसूल विभागाकडे सध्या केवळ एकच काम नाही. १०० हून अधिक प्रकारची कामे एकाच वेळी सांभाळावी लागतात. सध्या आगामी निवडणुकांची पूर्वतयारी आणि 'एसआयआर'चे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. तरीही नागरिकांच्या थेट हिताशी संबंधित असलेल्या 'जीपीआर'च्या तांत्रिक सुलभतेचा विषय आम्ही अत्यंत प्राधान्याने हाती घेतला आहे. असल्याचे सांगितले.

चुकीच्या गोष्टी स्वतःहून टाळा- जिल्हाधिकारी

सेतू आणि व्हीएलई चालकांचे प्रशासनाला नेहमीच चांगले सहकार्य राहिले आहे. क्षेत्रात कुठे काही चुकीच्या गोष्टी घडत असतील, तर त्या तुम्ही स्वतःहून प्रशासनाच्या निदर्शनास आणून देता, हा तुमचा प्रामाणिकपणा कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांची पाठ थपटली, व एसडीओ आणि तहसीलदारांनी दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करा. कोणत्याही चुकीच्या गोष्टी स्वतःहून सेंटर्सवर घडू देऊ नका. कारण अशा तक्रारी वरपर्यंत पोहोचतात. जे प्रामाणिकपणे काम करत आहेत, त्यांच्या पाठीशी प्रशासन खंबीर आहे आणि चुकीच्या कामांवर तात्काळ कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल असा इशारा दिला.

प्रशासनाने आयोजित केलेल्या या सत्रात सर्वांनी आपले प्रश्न अत्यंत अभ्यासूपणे मांडले. यापुढेही अशाच पद्धतीचे सहकार्य आणि समन्वय सेतू व व्हीएलई चालकांनी प्रशासनासोबत ठेवावा, असे आवाहन करत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सर्वांना आश्वस्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT