ओरोस ः जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कोकम व जांभूळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, 40 हजार शेतकर्यांना पिक विमा कधी देणार ते जाहीर करा, फयानसह गत वर्षीच्या नुकसानभरपाई पासून वंचित शेतकर्यांना भरपाई देण्यासाठी विमा कंपनीच्या अधिकार्यांसमवेत बैठक बोलवा, आदी मागण्या ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केल्या.
माजी आ. वैभव नाईक, माजी आ. परशुराम उपरकर, माजी आ. राजन तेली, सतीश सवांत, युवाना जिल्हाप्रमूख सुशांत नाईक आदींसह ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याशी चर्चा करत शेतकर्यांच्या समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडल्यामुळे कोकम, जांभूळ तसेच चवळी, भुईमूग आदी पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे कृषी विभागाकडून अद्याप पंचनामे झालेले नाहीत. कृषी विभाग अद्याप सुसेगाद आहे. तरी कोकम व जांभूळ उत्पादक शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी येत्या दहा दिवसात पंचनामे व सर्वेक्षण करून नुकसान भरपाई अहवाल शासनाला सादर करा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी येत्या आठ दिवसात कोकम पिकाचे क्षेत्र आणि झाडांची संख्या यानुसार पंचनामे करू असे सांगितले. त्यावर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी तात्काळ हे पंचनामे करून घ्या आणि अहवाल सादर करा अशा सूचना दिल्या.
शेतकर्यांना फार्मर आयडी काढण्याबाबतची सक्ती केली जात आहे, परंतु प्रत्यक्षात महाडीबीटी पोर्टलवर फार्मर आयडी काढण्यास विलंब होत आहे. सदर पोर्टल बंद असून फार्मर आयडी काढण्याची मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी या पदाधिकार्यांनी केली. आंबा व काजू पिक विमा योजनेची कर्ज भरण्याची मुदत 30 जून आहे. परंतु जिल्ह्यातील 40 हजार आंबा, काजू उत्पादक शेतकर्यांना गेल्या वर्षीची आंबा-काजू नुकसान भरपाई अद्याप दिलेली नाही. या प्रश्नी सातत्याने आंदोलने करूनही विमा कंपन्या योग्य कार्यवाही करत नाहीत, यासाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली विमा कंपनी अधिकारी, कृषी अधीक्षक, शेतकरी व आम्हाला बोलावून बैठक घ्यावी, अशी सूचना सतीश सावंत यांनी केली.
गेल्या वर्षीमध्ये भात उत्पादनामध्ये कमालीची घट झाली. प्रतिकूल हवामान आणि मोसमी पाऊस याचा फटका यावर्षीही भात उत्पादक शेतकर्यांना बसत आहे. अवकाळी पा उस लांबल्याने अजूनही वेगाने पेरणी सुरू झालेली नाही. यामुळे यावर्षी सुद्धा भात उत्पादनात कमालीची घट होणार असल्याची भीती या पदाधिकार्यांनी व्यक्त केली.
‘हत्ती हटाव’ मोहीम बाबत अद्यापही शासनाकडून कार्यवाही झालेली नाही, या प्रश्नावर जिल्हाधिकारी अनिल पाटील म्हणाले, यापूर्वी जिल्ह्यात दोन हत्ती होते आता त्यांची संख्या सहा झाली आहे. या हत्तींना त्यांच्या मूळ अधिवासात पाठविण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. याबाबत सचिव स्तरावर योग्य प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. यावर आ. वैभव नाईक यांनी यापूर्वी तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या मोहीमेसाठी 45 लाख रू. निधी उपलब्ध केला होता. त्या निधीचे काय झाले. निधी उपलब्ध असूनही व मोहीमेस यासनाची मंजुरी असूनही विलंब का होतोय? असा सवाल वैभव नाईक यांनी केला.
हवामान खात्याच्या ‘स्कायमेट’ यंत्रणेबाबत अनेक तक्रारी असूनही अजूनही काही तालुक्यात ही स्कायमेट यंत्रणा बसविली नाही. काही ठिकाणी चुकीच्या ठिकाणी हे स्कायमेट हवामान केंद्र सुरू आहेत. जिल्ह्यातील 57 हवामान केंद्रातील नोंदीबाबत तक्रारी असून ही केंद्रे तात्काळ दुरुस्त करावीत, अशी मागणीही करण्यात आली.