‘कोकणचे शिलेदार’ संघाची गडावर स्वच्छता मोहीम  
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : खारेपाटण किल्ल्याला मिळतेय जुने वैभव!

‘कोकणचे शिलेदार’ संघाची गडावर स्वच्छता मोहीम

पुढारी वृत्तसेवा

कासार्डे : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावात वसलेल्या सुमारे १२०० वर्षे जुन्या खारेपाटण दुर्गावर ‘कोकणचे शिलेदार’ संघाच्या वतीने २३ ऑगस्ट रोजी श्रमदान मोहीम उत्साहात राबविण्यात आली. या मोहिमेत मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेलेली प्राचीन पायरी विहीर आणि दुर्गाचा महादरवाजा पुन्हा उजेडात आणण्यात शिलेदारांना यश आले.

वर्षानुवर्षे माती व गाळाच्या ढिगाऱ्याखाली दडलेल्या या ऐतिहासिक वास्तूंची साफसफाई करून त्यांना पूर्वीचे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी शिलेदारांनी अथक परिश्रम घेतले. श्रमदानातून ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याचा संघाचा प्रयत्न कौतुकास्पद ठरत असून, या मोहिमेमुळे खारेपाटण दुर्गाचे ऐतिहासिक वैभव पुन्हा उजेडात येत आहे.

गड-किल्ल्यांवर जाऊन श्रमदान करण्याची गरज काय? त्यातून काय मिळणार? असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासोबतच आपल्या पूर्वजांनी बलिदान देऊन उभारलेल्या स्वराज्याचे खरे साक्षीदार असलेल्या गडकोटांचे संवर्धन करणे ही काळाची गरज असून ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. गड-किल्ले हे केवळ दगड-मातीच्या वास्तू नसून ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मावळे आणि शिलेदारांच्या पराक्रमाची जिवंत साक्ष देणारे ऐतिहासिक दस्तऐवज आहेत. आपल्या पूर्वजांचा हा धगधगता इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर दुर्गांचे जतन व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.

‘कोकणचे शिलेदार’ संघ याच उद्देशाने सातत्याने दुर्गसंवर्धनाच्या श्रमदान मोहिमा राबवत आहे. या ऐतिहासिक कार्यात समाजातील प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे. खारेपाटण दुर्गावर याच जोशात नवीन संवर्धन मोहिमेलाही प्रारंभ करण्यात आला. दुर्गाच्या पूर्व बुरुजाजवळील दरवाजाच्या परिसरात ही मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेचे उद॒घाटन शामदादा ताकमोगे यांच्या हस्ते करण्यात आले. संघातील शुभम राऊत, सिद्धी राऊत, सार्थक जाधव, सुमेधा तावडे, यश राऊत, अभिषेक शिरकर, दुर्वास सावंत, श्रेयस बाविलकर, कुणाल निकम, प्रथम चव्हाण, अक्षय तेली यांच्यासह अन्य शिलेदार उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT