देवगड ः देवगड तालुक्यातील पवित्र श्री देव कुणकेश्वर मंदिरात दरवर्षी 11 मे रोजी आयोजित केल्या जाणार्या विशेष पूजेमध्ये यंदाही देवगड हापूस आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आली. या अभिनव उपक्रमाची संकल्पना 2017 साली स्थानिक आंबा बागायतदारांनी मांडली होती, ज्याला कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट व पंचक्रोशीतील बागायतदारांनी मोलाचा प्रतिसाद दिला.
यावर्षी उष्णतेमुळे आंबा हंगाम लवकरच संपल्याने काही भक्तांनी श्रद्धेने आंबे विकत घेऊनही मंदिरात अर्पण केले. परिणामी, मंदिर परिसरात हापूसचा गोड सुवास दरवळला व भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पूजेनंतर ही आरास दुसर्या दिवशी प्रसाद स्वरूपात भाविकांना वितरित केली जाते,असे देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली यांनी सांगितले.
दरम्यान, देवस्थान ट्रस्टचे खजिनदार उदय पेडणेकर, सदस्य महेश जोईल, संजय वासुदेव वाळके, कुणकेश्वर सेवा मंडळ मुंबईचे माजी कार्याध्यक्ष सत्यवान तेली उपस्थित होते. देवगड हापूसचा महिमा, बागायतदारांचा अभिमान आणि मंदिराची आध्यात्मिक परंपरा एकत्र अनुभवायला मिळते.