सावंतवाडी ः कोकण आणि शिवसेनेचे नाते फार जुने आहे. आता तर जुने शिवसैनिक पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. त्यामुळे राजन तेली यांचा विजय निश्चित आहे. यावेळी दीपक केसरकर हा सज्जन माणूस वाटला होता. परंतु, साईबाबांचा भक्त म्हणवणार्या या माणसाने साईबाबांनी दिलेला श्रद्धा आणि सबुरी हा कानमंत्रच ते विसरले. ‘मनी नाही भाव आणि देवा मला पाव’ अशी त्यांची परिस्थिती आहे, अशी जोरदार टीका दीपक केसरकर यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी सावंतवाडी येथे आज आयोजित प्रचार सभेत केली आहे.
या प्रचार सभेत सावंतवाडी येथील उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेस व्यासपीठावर शिवसेना नेते विनायक राऊत, तेजस ठाकरे, मिलिंद नार्वेकर, उमेदवार राजन तेली, जान्हवी सावंत, माजी खासदार सुधीर सावंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी आमदार परशुराम उपरकर,जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष अॅड. रेवती राणे, शैलेश परब, विधानसभा मतदारसंघ प्रमुख रूपेश राऊळ, सतीश सावंत, माजी नगराध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर, बबन साळगावकर, शब्बीर मणियार, शरद कोळी, मायकल डिसोजा, बाळू परब, संजय गवस, डॉ.जयेंद्र परुळेकर, प्रथमेश तेली, उमेश कोरगावकर आदींसह सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील वेंगुर्ले, दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत थोडी चूक झाली. पण, आता चूक सुधारण्याची संधी आली असून तुम्हाला बदल घडवावाच लागेल. नाहीतर आपणास पुढची पिढी माफ करणार नाही. अन्यथा कायमचा दहशतवाद स्वीकारावा लागेल. यावेळी विनायक राऊत, ब्रिगेडियर सुधीर सावंत, उमेदवार राजन तेली, इर्शाद शेख यांची भाषणे झाली. राजन तेली यांनी मला व माझ्या कुटुंबाला धोका असून तुम्ही माझ्या कुटुंबाची जबाबदारी घ्या, मी जिल्ह्यातील सेनेची जबाबदारी घेतो.माझे काय होईल त्याचा विचार करणार नाही असे स्पष्ट केले.(Maharashtra assembly poll)
कोकणात भगवा फडकला पाहिजे. काँग्रेस, राष्ट्रवादी आमच्यासोबत आहेत. काहीजण महाराष्ट्र द्रोह्यांना मदत करण्यासाठी बंडखोरी करत आहेत. त्यांनी पापाचे धनी होऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. लोकसभेला तेली आले असते तर निकाल वेगळा असता. ‘देर है मगर अंधेर नहीं है..!’ हाती मशाल असल्याने प्रकाश सोबत आहे. त्यामुळे राजन तेली यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.
यावेळी प्रवीण भोसले, सतीश सावंत, परशुराम उपरकर यांचीही भाषणे झाली. स्टार प्रचारक शरद कोळी यांचेही लक्षवेधी भाषण झाले. माजी खासदार विनायक राऊत यांनीही जोरदार टीका केली.