सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील भटवाडी, काजरकोंड परिसरात मुस्लिम वेशात मदतीसाठी पैशांची मागणी करणाऱ्या तीन संशयित काश्मिरी नागरिकांना सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. स्थानिक हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला. पोलिसांनी त्यांची प्राथमिक चौकशी करून त्यांना परत पाठवण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
मदतीच्या बहाण्याने घरात प्रवेश आणि वाढलेला संशय
भटवाडी काजरकोंड परिसरातील एका घरात मुस्लिम वेश परिधान केलेल्या दोन पुरुष आणि एक युवती अशा तीन व्यक्तींनी प्रवेश केला आणि मदतीसाठी पैशांची मागणी सुरू केली. मात्र, त्यांच्या वागण्याबोलण्याचा संशय आल्याने घरच्यांनी स्थानिक हिंदुत्ववादी पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता हे तिघेही स्थानिक नसल्याचे आणि त्यांची हिंदी भाषाही वेगळी असल्याचे निदर्शनास आले. संशय अधिक बळावल्याने कार्यकर्त्यांनी पोलिसांना पाचारण केले.
पोलिस चौकशीत हे तिघेही जम्मू-काश्मीर राज्यातील कुपवाडा जिल्ह्यातील मणीगा गावचे रहिवासी असल्याचे समोर आले. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. सावंतवाडी पोलिसांनी अधिकृत पडताळणीसाठी थेट जम्मू-काश्मीरमधील संबंधित पोलिस ठाणे, तेथील बीट अंमलदार आणि सरपंचांशी फोनवरून संपर्क साधून माहिती घेतली. त्यांच्याकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतर, हे नागरिक फिरस्ते असल्याची नोंद करून त्यांना परत पाठवले.