नांदगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील कासार्डे-ब्राह्मणवाडी बॉक्सेवल ब्रीज ते तळेरे- पियाळीमार्गे फोंडाघाट रस्त्याला जोडणारा आंबा स्टॉपपर्यंतच्या रस्त्याची अक्षरक्ष: चाळण झाली आहे. परिणामी, या मार्गावर पादचारी व वाहनचालकांनाही कसरत करावी लागत आहे. गेल्या वर्षी लाखो रूपये खर्च करून या मार्गाचे नूतनीकरण करण्यात आले होते. मात्र निकृष्ट कामामुळे वर्षभराच्या आत हा मार्ग खड्डेमय बनला आहे. या मार्गाची सध्याची धोकदायक अवस्था पाहता, त्याचे तातडीने खडीकरण अथवा डांबरीकरण करावे, अशी मागणी वाहनचालक, प्रवाशी व नागरिक करत आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरुन तळेरे-पियाळी-गडमठ मार्गे फोंडाघाटकडे जाण्यासाठी कासार्डे-ब्राह्मणवाडी बॉक्सवेल येथून आंबा स्टॉप असा शॉर्टकट रस्ता आहे. गेल्या वर्षी या मार्गाची डागडुजी व डांबरीकरण करण्यात आले. मात्र, सध्या या रस्ताव डांबर शिल्लक नाही. रस्त्यावर जागोजागी गुडघाभर खड्डे पडले असून चिखल व धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यातून पादचारी व वाहनचालकांना कसरत करत वाट काढावी लागते. खरेतर या रस्त्याच्या दुरवस्थेस महामार्गाचे काम करणारी ठेकेदार कंपनी जबाबदार आहे. या ठेकेदार कंपनीचे कार्यालय, सिमेंट, खडी प्लांट व वाहनस्थळ या मार्गालगत होते. कंपनीचे अवजड डंपर, व मशनरींची सातत्याने वाहतूक या मार्गावर होत असे, यामुळे हा मार्ग खचला असून त्यांचे संपूर्ण खडीकरण, पिचिंग व डांबरीकरण होणे आवश्यक आहे. तसेच सध्या कासार्डे मायनिंगमधून सिलीका वाहतूक करणारे अवजड ट्रक याच मार्गाचा वापर करतात, यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाल्याचे स्थानिक ग्रामस्थ व वाहन चालकांचे म्हणणे आहे. तरी या संपूर्ण मार्गाचे नुतनीकरण करावे, अशी मागणी नागरिक व वाहनचालकांमधून होत आहे.