वैभववाडी : करूळ घाटातील काम अर्धवट असताना ठेकेदाराने वैभववाडी-करूळ या टप्प्यातील रस्ता नूतनीकरणाचे काम सुरू केले आहे. घाटमार्ग दुरुस्ती काम रेंगाळत ठेवून घाट बंद असल्याचे कारण दाखवून ठेकेदार अन्य कामे दमटवत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. करूळ घाटातून गेले 10 महिने वाहतूक बंद आहे. त्याचा फटका प्रवाशी, वाहतूकदार, व्यापारी, पर्यटक यांना बसत आहे. दरम्यान, साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. एकीकडे करूळ घाट बंद, तर दुसरीकडे भुईबावडा घाटातून पूर्ण क्षमतेने वाहतूक होऊ शकत नाही. त्यामुळे या वर्षीही जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत येणार आहे.
करूळ घाट नूतनीकरणाचे काम करण्यासाठी घाटातील सर्व प्रकारची वाहतूक 22 जानेवारी 2024 पासून बंद करण्यात आली आहे. घाटातील काम विनाअडथळा, निर्धोक, जलद गतीने करता यावे यासाठी घाटातील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. सुरुवातीला 31 मार्चपर्यंत घाटातील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्धारित वेळेत घाट नूतनीकरण होऊ शकले नाही. त्यामुळे ही मुदत वाढवण्यात आली. प्रशासनाकडून वाहतूक सुरू करण्याच्या तारीख पे तारीख देण्यात येत होत्या. दरम्यान, पहिल्याच पावसात घाटातील नवीन संरक्षक भिंत काँक्रिटीकरण रस्त्यासह वाहून गेली. त्यामुळे घाट दुरुस्ती कामाच्या निकृष्ट दर्जाचे पितळ उघडे पडले. त्यानंतर घाटमार्गात नव्याने बांधलेल्या अनेक संरक्षण भिंतींनाही तडे गेल्याचे व त्या खचल्याचे दिसून आले. त्यामुळे करूळ घाटमार्ग नूतनीकरणाचे काम वादाच्या भोवर्यात सापडले आहे.
आता पाऊस कमी झाल्याने घाट दुरुस्ती जलद गतीने होणे अपेक्षित होते. मात्र, तसे होताना दिसत नाही. अजूनही सुमारे दोन कि.मी. रस्ता काँक्रिटीकरण बाकी आहे; मात्र हे काम बाकी ठेवून ठेकेदाराकडून नवीन मंजूर झालेले वैभववाडी ते करूळ या टप्प्यातील रस्ता दुरुस्ती काम सुरू केले आहे. घाटमार्ग बंद असल्यामुळे तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गवरील वाहतूक बंद आहे. याचा फायदा घेत ठेकेदाराने नवीन काम हाती घेतले आहे. खरे तर घाट मार्गातील काम प्राधान्याने पूर्ण करून घाटातून वाहतूक सुरू करणे अपेक्षित आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत ठेकेदार पुढचे काम उरकून घेण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप नागरिक व वाहनचालक करत आहेत.
वैभववाडी तालुक्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊस शेती केली जाते. हा बहुतांश ऊस हा गगनबावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याला जातो. या साखर कारखान्याचा गळीत हंगाम लवकरच सुरू होणार आहे; मात्र करूळ घाट बंद असल्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार आहे. भुईबावडा घाटातून ऊस वाहतूक केली जाते; मात्र भुईबावडा घाटातील अरुंद वळणे, दरडी यामुळे या घाटातून ट्रक पूर्ण क्षमतेने भरून नेता येत नाही. त्याचबरोबर अंतरही वाढते. याचा आर्थिक फटका ऊस उत्पादक शेतकर्यांना बसतो; मात्र नाईलाजाने शेतकर्यांना या वर्षीही भुईबावडा घाटातूनच वाहतूक करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे.
घाट बंदचा फटका सर्वसामान्य प्रवासी, वाहनचालक, व्यापारी, पर्यटक, हॉटेल व्यावसायिक, शेतकरी असा समाजातील सर्वच घटकांना बसत आहे. अनेकांचा रोजगार धंदा बुडाल्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. सध्या राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधी इलेक्शनच्या लगीनघाईत व्यस्त आहेत, तर प्रशासन सुशेगात आहे, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे घाटातील वाहतूक सुरू होण्याबाबत अद्याप अनिश्चितता आहे.