देवगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने पुन्हा धडक कारवाई केली आहे. कर्नाटकातील मलप्पे बंदरातील ‘सुलतान’ट्रॉलर नौका देवगड-मुणगे समुद्रात बेकायदा ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करताना पकडून जप्त करण्यात आली. २ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री ही थरारक कारवाई करण्यात आली. नौकेवरील तांडेलसह एकूण सात खलाशांनाही ताब्यात घेण्यात आले. ही नौका देवगड बंदरात आणण्यात आली असून, तिच्याविरोधात कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
२ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वा. च्या सुमारास मत्स्यव्यवसाय विभागाचे पथक नियमित सागरी गस्त घालत असताना मुणगे समुद्रात किनाऱ्यापासून सुमारे ५ ते ६ नॉटिकल मैल अंतरावर ‘सुलतान’ नौका विनापरवाना ट्रॉलिंग मासेमारी करताना आढळून आली. गस्ती नौकेला पाहताच नौकेने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गस्ती पथकाने नौकेचा पाठलाग सुरू केला. अखेर देवगड समुद्रात या नौकेला रोखण्यात आणि ताब्यात घेण्यात अधिकाऱ्यांना यश आले. या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.