कणकवलीत जानेवारीत अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अधिवेशन 
सिंधुदुर्ग

Sindhudurg : कणकवलीत जानेवारीत अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अधिवेशन

कणकवली महाविद्यालयात 16, 17 जानेवारी रोजी आयोजन ः 350 अभ्यासक सहभागी होणार

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद ही महाराष्ट्रातील इतिहास विषयाच्या अभ्यासकांची अधिकृत संस्था असून यापूर्वी महाराष्ट्रात विविध ठिकाणी 32 अधिवेशने झाली आहेत. यावर्षीचे 33 वे राष्ट्रीय अधिवेशन कणकवली महाविद्यालयात 16 व 17 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आले आहे. तळकोकणातील हे पहिलेच राष्ट्रीय अधिवेशन असून त्यामध्ये अखिल भारतातातून सुमारे 350 अभ्यासक तसेच प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, अशी माहिती अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या अध्यक्षा डॉ. अरुणा मोरे यांनी दिली.

कणकवली महाविद्यालयाच्या एच. पी. सी. एल. सभागृहात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे सचिव प्राचार्य डॉ. सोपानराव जावळे, कार्यकारी मंडळ सदस्य डॉ. नारायण गवळी, डॉ. शोभा वाईकर, शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीचे सचिव विजयकुमार वळंजू, प्राचार्य युवराज महालिंगे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. सोमनाथ कदम, डॉ.राजेंद्र मुंबरकर अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्षाचे समन्वयक डॉ. शामराव डिसले, सामाजिक विज्ञान मंडळाचे सहसचिव डॉ. बी. एल. राठोड, प्रा. अमरेश सातोसे, कॉलेजचे कार्यालयीन अधीक्षक संजय ठाकूर आदी उपस्थित होते.

डॉ.मोरे म्हणाल्या, राज्याच्या विविध भागातून तसेच परदेशातून म्हणजे दुबई येथूनही प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनातून इतिहासाच्या नवसंशोधकांना व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. शिवाय प्राचीन वारसा असलेल्या वास्तू, कातळशिल्पे यांचेही जतन यानिमित्ताने होणार आहे.

डॉ.सोपानराव जावळे म्हणाले, या राष्ट्रीय अधिवेशनात प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक अशा तीन सत्रात शोधनिबंध सादर केले जातील. इतिहास परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात येईल. विजयकुमार वळंजू म्हणाले, सिंधुदुर्गातील निसर्गरम्य पर्यटनस्थळे, इथला ऐतिहासिक वारसा याचे सर्वांनाच आर्कषण आहे. या अधिवेशना निमित्त विचारवंत, साहित्यिक व कलावंताच्या या भूमीत आंतरविद्याशाखीय अभ्यासकांना भौगोलिक, अध्यात्मिक, ऐतिहासिक पर्यटन व संशोधनाची नवी पर्वणी मिळणार आहे. प्राचार्य युवराज महालिंगे म्हणाले, शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ.राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू व इतर पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास परिषदेचे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी पूर्वतयारी करीत आहोत. या अधिवेशनामुळे जिल्ह्याच्या इतिहासावरही प्रकाशझोत टाकला जाणार आहे. परिषदेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी शोध निबंध 30 नोव्हेंबर, 2025 पर्यंत पाठवायचे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT