कणकवली: कणकवली शहरामध्ये राजकीय वैर व कटुता निर्माण करण्यामागे कोण सुत्रधार आहेत हे जनतेला माहित आहे. प्रत्येकवेळी आपली भूमिका बदलत आपला राजकीय हेतू साध्य करण्याचे काम त्यांनी केले आहे. अशांना आता थारा द्यायचा नाही हे कणकवलीवासीयांनी ठरविले असून त्यांना परिवर्तन हवे आहे.
म्हणूनच कणकवलीकरांचा शहर विकास आघाडीला वाढता पाठींबा मिळत आहे. तर पराभवाची चाहूल लागल्यानेच भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे हे भावनिक मुद्दे प्रचारात आणत आहेत. मात्र त्यांचे बेगडी प्रेम राणे कुटुंबिय ओळखुन आहेत, अशी टीका कणकवली शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी केली. ‘भयमुक्त कणकवली’ हा आमचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.
कणकवली येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संदेश पारकर यांनी भाजपचे उमेदवार समीर नलावडे यांनी आ. नीलेश राणे यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. ‘खा. नारायण राणे यांचा फोटो बाजुला करणार्यांना आ. नीलेश राणे हे पाठिंबा देत आहेत’ असा आरोप समीर नलावडे यांनी केले होते.
त्यावर संदेश पारकर यांनी समीर नलावडे यांच्यावर जोरदार टीका केली. सत्यविजय भिसे हत्येनंतर शहरात जो प्रकार घडला त्याचे प्रमुख सुत्रधार कोण? कोणी संसार उद्ध्वस्त केले? हे शहरवासीयांना माहित आहे. स्वाभिमानी पक्षातून नगराध्यक्षपदाची उमेदवारी देऊन आ. राणे यांनी त्यांच्यावर उपकार केले आहेत. श्री. नलावडे यांचे राणे कुटुंबियांवरील प्रेम बेगडी असल्याची टीका श्री. पारकर यांनी केली.
कणकवली न.पं. निवडणुक विकासाच्या मुद्यावर लढणार आहोत, असे सांगणारे पराभव दिसू लागल्याने भावनिक मुद्दे काढत आहेत. मात्र कणकवलीतील त्यांची अनेक कृष्णकृत्ये कणकवलीवासीयांना माहित आहेत. शहरातील घर,जागा मालक तसेच बिल्डर त्रस्त आहेत. यांची आता दादागिरी नको असे शहरवासीयांचे मत असून ते या निवडणुकीमध्ये परिवर्तन घडविणार आहेत, असा विश्वास व्यक्त करतानाच आ. नीलेश राणे यांचे संदेश पारकर यांनी कौतुक केले.
आ. नीलेश राणे कणकवलीचे पालकत्व स्वीकारणार
विकास निधी हा सरकारच्या माध्यमातून येत असतो. कणकवली शहराचे पालकत्व आपण घेणार असल्याचे आ. नीलेश राणे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आम्ही विकास निधी आणू असे कुणी सांगू नये. दुबार मतदानाची संपूर्ण माहिती आ. राणे यांनी घेतली आहे. आरोप असलेला उमेदवार शहरातील सुज्ञ मतदार नाकारणार आहेत. सत्ता असताना तुम्ही लुटमार केली, त्यानंतर प्रशासकीय राजवटीतही तुम्ही हस्तक्षेप करत आलात. अशा दादागिरी करणार्यांना कणकवलीतील नागरिक कदापी स्वीकारणार नाहीत, असे संदेश पारकर यांनी सांगितले.