कणकवली: कणकवली नगरपंचायतची निवडणूक दिवसेंदिवस अधिक रंगतदार होवू लागली आहे. राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी व उमेदवार यांच्याकडून आरोप प्रत्यारोप वाढू लागल्याने शहरातील राजकीय हवा काहीशी तापू लागली आहे. त्या पार्श्वभुमीवर पोलिस प्रशासन देखील सतर्क झाले असून चौक, वर्दळीच्या ठिकाणी पायी पेट्रोलिंग करत आहेत.
सिंधुदुर्गात कणकवली हे मध्यवर्ती शहर असून राजकीय केंद्र ही झाले आहे. गेल्या काही निवडणूकांतील राजकीय घडामोडींमुळे कणकवलीची ओळख राजकीय संवेदनशील शहर अशी सुध्दा झाली आहे. कणकवलीतील मागील काही निवडणूका अतिशय रंगतदार व अटीतटीच्या झाल्या आहेत.
नगरपंचायतीची सध्याची निवडणूक जाहीर झाल्यानंतर ती काहीशी एकतर्फीच होईल असे सुरुवातीचे चित्र होते. मात्र शहर विकास आघाडीचा नवा फॉर्मुला तयार होत त्यात राज्यातील एकमेकांचे विरोधक असलेले पक्षही सामावले गेले आणि निवडणुकीचे चित्रच बदलले. कणकवलीच्या निवडणूकीची रंगत जसजशी वाढू लागली तसतशी पोलिस यंत्रणा सुध्दा अधिक अलर्ट होऊ लागली आहे.
निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर कणकवलीचे पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली शहरात रविवारी सायंकाळी पोलिसांचे चालत शहरात पायी पेट्रोलिंग करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे, पोलीस हवालदार पांडुरंग पांढरे व स्टायकिंग पथक यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.