Kankavli Nagar Parishad election result
कणकवली: नगरपरिषद निवडणुकीच्या आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार कणकवलीमध्ये नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. १५ पैकी ८ जागा भाजपला मिळाल्या असल्या तरी नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे मुख्य शिलेदार आणि ठाकरे गटाचे उमेदवार संदेश पारकर विजयी झाले आहेत.
कणकवली नगराध्यक्ष पदासाठी 3 तर १७ नगरसेवक पदांसाठी ३६ असे ३९ उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे कणकवलीकर कुणाच्या बाजूने कौल देतात याची उत्कंठा सर्वांनाच होती. कणकवली न.पं. निवडणूकीत भाजप विरोधात दोन्ही शिवसेना व काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी यांची शहरविकास आघाडी अशी थेट दुरंगी लढत झाली.
दोन्ही बाजूने जोरदारपणे प्रचार यंत्रणा राबविण्यात आली होती. त्यामुळे या निवडणूकीच्या निकालाकडे कणकवलीसह जिल्हावासियांचे लक्ष लागले होते. मालवणमध्ये भाजप, शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना यांच्यात तिरंगी तर वेंगुर्ले आणि सावंतवाडीत भाजप, शिंदे शिवसेना, काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना अशी चौरंगी लढत झाली होती. त्यामुळे या नगरपालिकांवर कुणाचा झेंडा फडकतो याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती.
मालवण नगरपरिषदेत शिंदे शिवसेनेचा मोठा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत राणे बंधूंमधील सत्तासंघर्ष राज्याने पाहिला. त्यामुळे या निवडणुकीत कोण जिंकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निकालांच्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. निलेश राणे यांनी या विजयाचे संपूर्ण श्रेय कार्यकर्ते आणि उमेदवारांना दिले आहे. ते म्हणाले की, मी केवळ एक नामधारी होतो, परंतु आमचे उमेदवार निष्कलंक आणि ताकतीचे होते, ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर हा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद मोलाचा ठरला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामाचा तळागाळातील लोकांनी उस्फूर्त पाठिंबा दिला, ज्याचा फायदा शिवसेनेला या निवडणुकीत झाला.