कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या थेट नगराध्यक्ष आणि 17 नगरसेवक पदांच्या निवडणुकीसाठी मंगळवार, 2 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वा. या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. सोमवारी कणकवली तहसीलदार कार्यालय येथून 17 मतदानकेंद्रांवर ईव्हीएम मशिन व साहित्य घेऊन अधिकारी आणि कर्मचारी रवाना झाले.
या निवडणुकीसाठी अधिकारी, कर्मचारी आणि पोलिस मिळून 110 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती कणकवलीचे निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी दिली. कणकवली तहसीलदार कार्यालय येथे सोमवारी सकाळी 11.30 वा. मतदानकेंद्रांवर ईव्हीएम मशिन व मतदान साहित्य नेणार्या वाहनांचा शुभारंभ करण्यात आला. निवडणूक निरीक्षक विवेक गोडके यांनी निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी तहसील कार्यालयाला भेट दिली.
प्रांताधिकारी जगदीश कातकर, निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दीक्षांत देशपांडे, सहा.निवडणूक निर्णय अधिकारी गौरी पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव, पोलिस निरीक्षक तेजस नलवडे, उपनिरीक्षक पवन कांबळे व मतदान अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी 3 झोनल अधिकारी, 1 राखीव झोनल अधिकारी, 17 मतदान केंद्रांवर 1 केंद्राध्यक्ष, 3 मतदान अधिकारी, 1 पोलिस , 1 शिपाई मिळून कामकाजासाठी 85 व राखीव मिळून 110 अधिकारी व कर्मचार्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.
तर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलाच्या वतीने पोलिस निरीक्षक तेजस नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली 8 पोलिस अधिकारी, 86 पोलिस अंमलदार, पोलिस नाईक, कॉन्स्टेबल, 68 होमगार्ड असे मिळून 162 पोलिस कर्मचार्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. या निवडणुकीसाठी एक आचारसंहिता पथक, एक भरारी पथक कार्यरत असणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी सांगितले.
13 हजार 278 मतदार बजावणार मतदानाचा हक्क
कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादीनुसार 13 हजार 278 मतदार मतदानाचा हक्क बजावत कणकवलीचा नगराध्यक्ष व 17 नगरसेवक निवडणार आहेत. कणकवलीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची युती विरुद्ध ठाकरे शिवसेना, शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस तसेच इतर पक्ष यांची शहर विकास आघाडी अंतर्गत क्रांती विचार पक्ष यांच्यात थेट दुरंगी लढत होणार आहे.
तर आम आदमी पार्टी, लोकराज्य जनता पार्टी यांचे दोन स्वतंत्र उमेदवार आहेत. नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून समीर नलावडे, क्रांती विचार पक्षाचे संदेश पारकर, लोकराज्य जनता पार्टीचे गणेश प्रसाद पारकर हे 3 उमेदवार रिंगणात आहेत. तर 17 नगरसेवकपदासाठी 36 उमेदवार मिळून 39 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात मंगळवारी बंद होणार आहे.
सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. या वेळेनंतर मतदान यंत्रे सिल करून येथील तहसील कार्यालयातील स्ट्राँग रूम मध्ये ठेवण्यात येणार आहेत. तसेच 3 डिसेंबर रोजी मतमोजणी येथील तहसील कार्यालयात करण्यात येणार आहे.
‘या’ मतदानकेंद्रांवर होणार मतदान
कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी रा.बा. उचले प्राथ. शाळा नं. 1 , जि.प.शाळा क्र. 2., सद्गुरु भालचंद्र महाराज शाळा क्र. 3, जि.प. शाळा क्र. 5, विद्यामंदिर हायस्कूल कणकवली या 5 शाळांमध्ये 17 केंद्रांवर मतदान होणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रात एक ईव्हीएम मशिन असणार आहे. मतदारांनी एकाच ईव्हीएम मशिनवर नगराध्यक्ष व नगरसेवक निवडण्यासाठी मतदान करायचे आहे.