कणकवलीत युती होईल न होईल; भाजप एक पाऊल पुढे! file photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg politics : कणकवलीत युती होईल न होईल; भाजप एक पाऊल पुढे!

नगराध्यक्षपदासाठी समीर नलावडेंचे नाव निश्चित; शहर आघाडीचे चित्र अद्यापही अस्पष्टच

पुढारी वृत्तसेवा

कणकवली ः कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यात युती होईल की न होईल हे सध्या तरी सांगता येत नसले तरी भाजपने मात्र एक पाऊल पुढे टाकत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याबरोबरच प्रचाराचाही शुभारंभ केला आहे. येत्या दोन दिवसांत भाजपच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. कणकवलीत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमदेवार म्हणून माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे नाव निश्चित झाले आहे. त्यांच्यासह त्या त्या प्रभागातील इच्छुक उमेदवार प्रचाराला लागले आहेत. परंतु दुसरीकडे महाविकास आघाडी किंवा शहर विकास आघाडी यांच्याबाबत अद्यापही चित्र स्पष्ट झालेले नाही. त्यांचे नेतेही सध्या याबाबत मौन बाळगून असल्याचे चित्र आहे.

कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आता अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत, परंतु महायुती आणि महाविकास आघाडी किंवा शहर विकास आघाडी याबाबत अद्यापही स्पष्टता आलेली नाही. मात्र भाजपने यात आघाडी घेत इच्छुक उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया बुधवारी पार पडली तर गुरुवारी कणकवलीचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू मंदिरात श्रीफळ वाढवून आपल्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभही केला आहे. आता प्रतीक्षा आहे ती नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या घोषणेची. तोपर्यंत सर्वच इच्छुक उमेदवारांना कमळ हे चिन्ह घेऊन आपआपल्या प्रभागात प्रचाराला सूरूवात करण्याचे निर्देश नेत्यांनी दिले आहेत. दरम्यान कणकवलीत भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यात गेल्या काही दिवसांपासून युती होणार की नाही? याबाबत चर्चा सुरू असताना बुधवारी रात्री शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची ओम गणेश बंगल्यावर भेट घेतल्याचे समजते. यावेळी युतीबाबत चर्चा होऊन

शिंदे शिवसेनेकडून एक प्रस्तावही भाजपकडे दिल्याचे समजते. मात्र त्यावर चर्चा होऊन काय निर्णय होतो? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. एकीकडे भाजपने प्रचाराला सुरुवात केली असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीच्या गोटात मात्र अद्यापही शांतताच असल्याचे दिसून येते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत शहर विकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढविण्याचे निश्चित करण्यात आले होते, परंतु महाविकास आघाडीतील काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने या शहर विकास आघाडीबाबतही प्रश्नचिन्हच आहे. अधिकृतपणे अद्याप याबाबत कुणीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे चार दिवस उलटले तरी अद्यापपर्यंत महाविकास आघाडी की शहर विकास आघाडी हे ठरत नसल्याने लढत नेमकी कशी होणार? हा प्रश्न आहे. सध्या आघाडीकडून उमेदवारांची चाचपणी सुरू असली तरी भाजपच्या तुलनेत सध्या तरी विरोधक पिछाडीवर असल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT