कणकवली : कणकवली नगरपंचायतीची नगराध्यक्ष निवड झाल्यानंतर आता कणकवली न.पं.चा उपनगराध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. भाजप आणि शहर विकास आघाडी या दोघांकडूनही उपनगराध्यक्ष पदावर दावे करण्यात आले आहेत. दरम्यान बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्य मंत्रीमंडळाने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या सुधारणेनुसार नगरपरिषद आणि नगरपंचायतीमधील थेट निवडून आलेल्या अध्यक्षांना सदस्यत्वासह मतदानाचा अधिकार देण्यात येणार आहे. मात्र याबाबतच्या अध्यादेशानंतरच याबाबत स्पष्टता येणार आहे.
कणकवली नगरपंचायतीच्या निवडणूकीत शहर विकास आघाडीचे संदेश पारकर हे थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. तर भाजपचे 9 आणि शहर विकास आघाडीचे 8 असे मिळून 17 सदस्य निवडून आले आहेत. आता उपनगराध्यक्ष पद भाजपकडे जाणार की शहर विकास आघाडीकडे जाणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आपणास सदस्य म्हणून 1 आणि निर्णायक म्हणून 1 अशा दोन मतांचा अधिकार असल्याने शहर विकास आघाडीचाच उपनगराध्यक्ष बसेल असा दावा केला होता. तर भाजपकडून नगरपंचायतीमध्ये भाजपचे 9 सदस्य असल्याने बहुमत आहे. नगराध्यक्षांना निर्णायक मत असले तरी उपनगराध्यक्ष निवडीवेळी मतदानाचा अधिकार नाही. जे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत त्यातूनच उपनगराध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यामुळे बहुमतामुळे भाजपचाच उपनगराध्यक्ष होईल, असा दावा केला आहे. दरम्यान मुख्याधिकार्यांशी याबाबत संपर्क साधला असता उपनगराध्यक्ष निवडीबाबत शासनाकडून जारी केलेले अध्यादेश आम्ही तपासत आहोत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी याबाबत काही निर्णय झाला आहे. शासनाच्या मार्गदर्शनानुसारच याबाबतची पुढील कार्यवाही होईल असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र शासनाच्या सुधारित अध्यादेशानंतरच याबाबत स्पष्टता येणार आहे. तोपर्यंत तरी कणकवली उपनगराध्यक्ष पदाबाबत दोन्ही बाजूने दावे राहणार आहेत.