कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे या प्रवर्गातील पुरुष किंवा महिला उमेदवारांना संधी आहे, त्याचबरोबर खुल्या प्रवर्गातील इच्छुकांचे पत्ते मात्र कट झाले आहेत. आरक्षण जाहीर झाल्याने आता कणकवली नगरपंचायतीचा पुढील सातवा नगराध्यक्ष कोण? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
2017 साली झालेल्या नगरपंचायतच्या निवडणूकीवेळी कणकवली न.पं. चे थेट नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण म्हणजेच खुले होते. त्या निवडणूकीत समीर नलावडे हे नगराध्यक्ष म्हणून विजयी झाले होते. त्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर गेली तीन वर्षे या नगरपंचायतीवर प्रशासकीय राजवट आहे. आता नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग येणार आहे.
दरम्यान येत्या 8 ऑक्टोबर रोजी नगरसेवकाच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडती जाहीर होणार आहेत. त्यामुळे पुढील दोन महिन्यात नगरपंचायत, नगरपालिकांचा बिगूल वाजणार आहे.
कणकवली नगरपंचायतीवर आतापर्यंत नगराध्यक्ष म्हणून संदेश पारकर, सौ. मेघा गांगण, स्व. सायली मालंडकर, सौ. प्रज्ञा खोत, सौ. माधुरी गायकवाड आणि समीर नलावडे या सहाजणांची वर्णी लागली होती. त्यामुळे आता कणकवलीचा सातवा नगराध्यक्ष कोण असणार? याची उत्सुकता कणकवलीकरांना आहे.
राज्यातील 247 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. बुधवार 8 ऑगस्ट रोजी त्या त्या नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये ही आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. 9 ऑक्टोबरला प्रारुप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार असून 9 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत जिल्हाधिकार्यांकडे प्रारुप आरक्षणावर हरकती व सूचना सादर करावयाच्या आहेत. तर अंतिम आरक्षण शासन राजपत्रात 28 ऑक्टोबरला मुख्याधिकार्यांमार्फत प्रसिद्ध केले जाणार आहे.