कंदील, पणत्या, रोषणाईने कणकवली बाजारपेठ सजली! 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : कंदील, पणत्या, रोषणाईने कणकवली बाजारपेठ सजली!

महागाईची झळ तरी ग्राहकांचा उत्साह कायम

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : दीपापवलीचा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. कणकवली बाजारपेठ विविध प्रकारच्या आकर्षक साहित्यानी सजली असून रंगीबेरंगी आकाशकंदील, पणत्या, विद्युत रोषणाईच्या माळा, सजावटीच्या वस्तू, रांगोळीचे साहित्य आदी वस्तूं खरेदीसाठी लगबग आहे. विविध आकारांतील आणि नवनवीन आकर्षक डिझाइनमधील आकाशकंदील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. महागाई असली तरी ग्राहकांचा खरेदीला उत्साह मात्र कायम आहे.

दिवाळी म्हटली की घरासमोर लावला जाणारा आकाशकंदील हे या सणाचे खास आकर्षण असते. पारंपरिक कंदिलांसोबतच यंदा बाजारपेठेत आधुनिक पद्धतीचे, विविध रंगसंगतीतील, आकर्षक नक्षीकाम असलेले तसेच लांब झिरमिळ्या असलेले आकाशकंदील विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच हे कंदील आकर्षित करीत आहेत. व्यापाऱ्यांनीही विविध प्रकारचे दिवाळी साहित्य दुकानांमध्ये उपलब्ध करून दिले आहे. घराची सजावट, पणत्या, विद्युत रोषणाई, पूजेसाठी लागणारे साहित्य आणि फराळाच्या तयारीसाठी आवश्यक वस्तूच्या खरेदीला बाजारात गर्दी होत आहे.

कणकवली ही मुख्य बाजारपेठ असल्याने ग्रामीण भागातील ग्राहकाची दिवाळी खरेदीसाठी येथे मोठी गर्दी होत असते. सणाच्या ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन यंदा विविध रंगांचे आकर्षक डिझाईन मधील आकाश कंदील मापक दरात विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. यासोबतच गारमेंट्स, मिठाई फराळाच्या पदार्थांची दुकाने गजबजली आहेत. काहीनी आधीच आपल्या ऑर्डरी बुक केल्या आहेत तर ड्रायफूट तुपातील मिठाईसाठी विशेष मागणी असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. तर दुसरीकडे घराघरात महिला वर्गाची फराळासाठी लगबग सुरू आहे.

दिवाळीनिमित्त भाजप व शहर विकास आघाडीने शहरात दिवाळी बाजार भरवला असून या ठिकाणी दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तुंची खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. बच्चे कंपनी देखील किल्ले व नरकासुर बनवण्याच्या कामात मग्न आहे.

महागाई असली तरी ग्राहकांचा खरेदीला उत्साह

गतवर्षीच्या तुलनेत यंदा महागाई असली तरी कपडे, फराळ, सुशोभीकरणाच्या साहित्य खरेदीसाठी बाजारात नागरिकांमध्ये उत्साह पाहावयास मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT