कणकवली : शहरातील मुख्य चौकात थांबून वाहतुकीस अडथळा ठरत असलेली मोकाट गुरे. (छाया : नितीन सावंत) 
सिंधुदुर्ग

Sindhudurg |कणकवलीच्या मुख्य चौकात भरते मोकाटांची 'गोशाळा'!

कणकवलीच्या मुख्य चौकात भरते मोकाटांची 'गोशाळा'!

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : कणकवली शहराचा केंद्रबिंदू असलेल्या आप्पासाहेब पटवर्धन मुख्य चौकात मोकाट गुरांचा नेहमीच वावर असतो. दिवसा चौकात थांबून असलेली ही मोकाट गुरे रात्री तेथेच मुक्काम ठोकतात. त्यामुळे रहदारीला अडथळा होत असतानाच गुरांच्या मलमूत्रांची दुर्गंधी आणि अस्वच्छतेचाही त्रास सहन करावा लागतो. मोकाट गुरांचा सततचा वावर आणि त्यांच्या मुक्कामामुळे मुख्य चौकाला जणू गोशाळेचे स्वरूप आले आहे.

कणकवली शहरातील मोकाट जनावरांची समस्या गेली काही वर्षे नेहमीचीच डोकेदुखी बनली आहे. शहरातील रस्त्यांवर थांबलेली गुरे ठिकठिकाणी पाहायला मिळतात. अनेकवेळा बाजारात गर्दीच्या वेळी झुंडीने धावणारी गुरे नागरिक व पादचाऱ्यांना इजा पोहोचवतात. अनेकवेळा ही मोकाट गुरे अपघाताचेही कारण ठरली आहेत. तर काही वेळा वाहनांच्या धडकेने गुरे जखमी सुद्धा झाली आहेत. आता तर या मोकाट गुरांनी शहरातील मुख्य चौकातच ठाण मांडल्याचे दिसून येते. दिवसा रात्री या चौकातून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना व पादचाऱ्यांनाही या मोकाट गुरांमधूनच कसरत करत मार्ग काढावा लागतो.

यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून १० ते १५ मोकाट गुरांनी आपला मुक्काम मुख्य चौकात ठोकला आहे. काही मोकाट गुरे दिवसभर चौक व परिसरात थांबलेली असतात. सांयकाळी यांच्या संख्येत आणखीन भर पडते. उड्डाणपुलाखालील पावसाचा त्रास होत नसल्याने निवाऱ्यासाठी सोयीची जागा असल्याचे लक्षात आल्याने या मोकाट गुरांनी मुख्य चौकात मुक्काम करण्यास सुरुवात केली आहे. मोकाट गुरांच्या रात्रीच्या मुक्कामामुळे सकाळी चौकात सर्वत्र शेण पसरलेले असते. त्यातूनच वाहने गेल्याने सर्वत्र दुर्गंधी निर्माण होते. चौकात बसणारे विक्रेते, वाहनांची कोंडी होऊ नये म्हणून नेहमी थांबणारे पोलिस, होमगार्ड व ये-जा करणारे पादचारी वाहन चालक या सर्वांनाच दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो.

गेले काही महिने मुख्य चौकात मोकाट गुरांचा वावर सुरू असूनही त्यावर कोणतीही उपाययोजना नगरपंचायत व प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी न.पं. कडून वागदे येथे मोकाट गुरांसाठी कोंडवाडा काढण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. यापूर्वी ही कणकवली न.पं. कडून असा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे या योजनेला किती यश येईल हे येत्या काळात दिसून येणार आहे. मात्र सध्या तरी नागरिकांना मुख्य चौकातील हा त्रास सहन करावा लागणार आहे.

मालक नामानिराळे

मुख्य चौकासह शहराच्या इतर भागात दिसून येणारी मोकाट गुरे ही काही स्थानिक शेतकऱ्यांच्या मालकीची आहेत. खरे तर ग्रामीण भागातील शेतकरी आपली गुरे नेहमीच राखण करण्याबरोबरच नियमित गोठ्यात बांधताना दिसून येतात. मात्र शहरातील या गुरांकडे मालकांकडून दुर्लक्ष केला असताना जातो, गुरांची नियमित जोपासना मोकाट सोडून मालक नामानिराळे राहताना दिसून येतात. खरेतर न.पं. प्रशासनाने या मालकांचा शोध घेत तशी कारवाई करणे अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT