‌Sindhudurg News 
सिंधुदुर्ग

‌Sindhudurg News : ‘पडीक‌’एकांकीकेने जिंकली रसिकांची मने!

बालकलाकारांच्या दमदार अभिनयाने महापुरुष महाउत्सव रंगतदार

पुढारी वृत्तसेवा

कणकवली ः कणकवली शहरातील श्री देव महापुरुष मंदिर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सुरू असलेल्या महापुरुष महाउत्सवात ‌‘पडीक‌’ एकांकिकेने रसिकांची मने जिंकली. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान निर्मित, मनोज मेस्त्री लिखित व राकेश काणेकर दिग्दर्शित या एकांकिकेचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. राजकीय व्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या या एकांकिकेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

विद्यामंदिर प्रशालेच्या बालकलाकारांनी अत्यंत उत्कृष्ट व व्यावसायिक धाटणीचा अभिनय साकारत उपस्थितांची वाहवा मिळवली. संवादफेक, हावभाव आणि रंगमंचावरील आत्मविश्वास यामुळे ‌‘पडीक‌’ने कार्यक्रमाची उंची वाढवली. विशेष म्हणजे कणकवली नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्यासह उपस्थित रसिकांची मने या बालकलाकारांनी जिंकली.

मुख्याधिकारी गौरी पाटील म्हणाल्या,“विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी ‌‘पडीक‌’चे सादरीकरण अत्यंत सुंदर आणि व्यावसायिक पद्धतीने केले. या मुलांमध्ये दडलेले कलागुण उल्लेखनीय असून भविष्यात ही मुले मोठी कलाकार होतील, यात शंका नाही. महापुरुष मित्रमंडळाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष असून सुरू असलेल्या सर्व उपक्रमांना माझ्याकडून शुभेच्छा. कोकण ही कलाकारांची भूमी आहे. भक्ती व कलांचा सुंदर संगम या महापुरुष महाउत्सवात अनुभवायला मिळत आहे.” मंडळातर्फे गौरी पाटील यांचा नगरसेविका सुमेधा अंधारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दरम्यान, सकाळच्या सत्रात धार्मिक विधी पार पडले. महापुरुष मंदिराच्या कलशाचे विधिवत रोहन मंदार सापळे व मानसी सापळे यांच्या हस्ते करण्यात आले. ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात प्रसाद अंधारी व सुमेधा अंधारी या दाम्पत्याच्या हस्ते विविध विधी झाले. या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाला शहरातील गावपुरुष,वस,गावचे खोत, विविध क्षेत्रातील राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, प्रतिष्ठित व्यापारी, सामाजिक संस्था, डॉक्टर, वकील, पत्रकार, विविध मंडळे, सामाजिक संस्था तसेच भाविक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT