Sindhudurg murder 
सिंधुदुर्ग

Sindhudurg murder | कणकवलीत बांधकाम व्यावसायिकाचा गोळी झाडून खून; शहरात खळबळ

या खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून हा घातपात असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : शहरातील मुडेडोंगरी परिसरातील न.पं.च्या पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ मोहन मळा नजिक पायवाटेवर शुक्रवारी (दि.२७) पहाटे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशांत जनार्दन दळवी (वय 40) यांचा गोळी घालून खून करण्यात आला. मृत अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दळवी हे मूळ कळसुली गावसेवाडी येथील रहिवासी असून सध्या कणकवलीत स्थायिक होते.

प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्रीनंतर अज्ञात इसमांनी पिस्तुलाच्या सहाय्याने त्यांच्या डोक्याच्या मध्यभागी गोळी झाडून खून केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गोळी झाडल्यानंतर मृतदेह काही अंतर ओढत नेऊन पायवाटेवर टाकण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी रक्ताचे डाग आढळून आले असून, दळवी यांच्या डोक्यावर गोळी लागल्याच्या स्पष्ट खुणा दिसून येत होत्या.

दरम्यान, शुक्रवारी पहाटे सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास मोहन मळा परिसरातील शेतघरात राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या कामगाराला प्रातविधीसाठी जात असताना हा मृतदेह दिसून आला. त्याने तातडीने आपल्या मालकाला याची माहिती दिली. त्यानंतर मालकाने कणकवली पोलिस ठाण्यात जाऊन घटनेची खबर दिली.

माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, कणकवली पोलिस निरीक्षक तेजस नलावडे, उपनिरीक्षक पवन कांबळे, अनिल हाडळ, वृषाली बरगे तसेच कॉन्स्टेबल पांडुरंग कलंतरे, सागर जाधव, मिलिंद देसाई, महेश शेडगे यांच्यासह पोलिसांची मोठी टीम घटनास्थळी दाखल झाली. तसेच फॉरेन्सिक तज्ञांनाही पाचारण करण्यात आले. या घटनेची वार्ता समजताच परिसरातील नागरिक, बांधकाम व्यावसायिक तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून हा घातपात असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, पोलिसांनी परिसराची पाहणी करून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT